जगामध्ये जगदीश । विवेके वाेळखावा ।।2।।

21 Apr 2023 15:17:03
 
 

saint 
 
त्याप्रमाणे सत्यज्ञानी पुरुष या मायेतून सगुण व निर्गुण वेगवेगळे काढून सगुणाचा त्याग करून निर्गुण स्वानंदाचे सेवन करून धन्य हाेतात. उसामध्ये अंतर्यामी रस असताे आणि ताे काढला तर चाेयट्याच उरतात. त्याचप्रमाणे विश्वातून परमतत्त्व काढले तर बाकीचे त्याज्यच आहे. अशा या आत्म्यासारखी दुसरी वस्तूच नाही. म्हणून मला दृष्टांत देता येत नाही, असे सांगून श्रीसमर्थ श्राेत्यांनी ब्रह्म आणि माया यांचा परस्परसंबंध अंत:करणानेच जाणावा असे सांगतात.यासाठी ते मातीच्या घड्याचे साेपे उदाहरण देतात.कुंभाराने मातीपासून घडा करण्यापूर्वी आकाश असतेच.घडा तयार झाला की, त्यातील पाेकळीमध्ये आकाश असतेच आणि कालांतराने घडा ुटून गेला तरीही आकाश ुटत नाही, तुटत नाही, नाश पावत नाही, ते तसेच अचलअविनाशी शिल्लकच राहते.
 
अगदी त्याचप्रमाणे परब्रह्मातूनच सकळ चराचर वस्तू आणि विश्व निर्माण हाेते. या अनेक वस्तूंमध्ये ते परब्रह्म भरून राहिलेले असते. पुढे वस्तूंचा नाश झाला तरी अचळ आणि अढळ असलेले परब्रह्म तसेच राहते. म्हणजेच असणारे व दिसणारे हे सर्व विश्व परब्रह्माचीच मायारूपी लीला आहे. त्याची निर्मिती परब्रह्मातून हाेते आणि त्याचा लय झाला तरी मूळ परब्रह्म तसेच स्थिर असते, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, या मायेत गुंतल्यावर माणसाला ‘काेहं’ म्हणजे मी काेण आहे, हा प्रश्न पडताे. विवेकाने याला ‘साेहं’ म्हणजे मी ताेच परमात्मा अंशरूपाने आहे हे ज्ञात हाेते आणि मग मी आणि तू हा भेद मावळून जाताे. ही भाग्याची अवस्था साधकाला ज्ञान व भक्ती यामुळेच प्राप्त हाेऊ शकते.
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0