आतां हृदय हें आपुलें । चाैाळूनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूचीं ।। 15.1

21 Apr 2023 15:23:04
 
 

Dyaneshwari 
 
ज्ञानेश्वरांनी केलेल्या उत्कृष्ट नमनांपैकी हे पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभीचे नमन आहे.श्रीगुरूंविषयी ज्ञानेश्वरांना किती नितांत प्रेम आहे हे आपण मागे तेराव्या अध्यायातील ‘आचार्याे पासनम्’ या शब्दावरील विस्तृत भाष्यात पाहिले. या पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंचे मनापासून वर्णन करीत आहेत. ते असे म्हणतात की, आता शुद्ध असलेल्या अंत:करणाचा चाैरंग करून त्यावर गुरूंच्या पावलांची स्थापना करावी. श्रीगुरू व आपण एक आहाेत अशा समजूतरूपी ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळांच्या कळ्या भरून श्रीगुरूंच्या चरणांवर अर्पण कराव्यात. एकनिष्ठतारूप स्वच्छ पाण्याने श्रीगुरूंना स्नान घालावे. त्याची आठवण हेच एक गंधाचे बाेट त्यांना लावावे. श्रीगुरूंचे प्रेम हेच एक साेने शुद्ध करून त्याचे लहान वाळे करून सद्गुरूंच्या पायांत घालावेत.
 
अनन्यतेने शुद्ध झालेले दृढ प्रेम हीच त्यांच्या पायांतील जाेडवी हाेत. आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची कमळकळी हेच काेणी आठ पाकळ्यांचे कमळ समजून ते सद्गुरूंच्या पायांवर वहावे. देहादिकांचा अभिमान हा धूप करून सद्गुरूंसमाेर जाळावा. देहापैकी मी काेणी नाही. हे एक तेज असून या तेजाने सद्गुरूस नेहमी ओवाळावे. त्यांच्या चरणांना सतत आलिंगन द्यावे.श्रीगुरूंच्या दाेन्ही पायांत माझे शरीर व प्राण या दाेन खडावा असाव्यात. भाेग व माेक्ष हे दाेन्ही गुरूंच्या चरणांवरून ओवाळून टाकावेत.धर्म, अर्थ, काम, माेक्ष यांचा राज्याभिषेक ज्या दैवाने प्राप्त हाेताे, ते दैव श्रीगुरूंच्या उपासनेमुळे मला अनुकूल हाेईल. या दैवामुळे ज्ञान उत्कर्षाला पावते व दैव वाचेला अमृताचा समुद्र बनविते. हे दैव अक्षरांना चंद्राप्रमाणे गाेडी प्राप्त करून देते.
Powered By Sangraha 9.0