सहाव्या दशकातील तिसरा समास मायाेद्भवनिरुपण हा असून त्यात श्रीसमर्थांनी दिसणारे सर्व विश्व ही परमेश्वराच्या लीलेमुळे निर्माण झालेली माया असून ब्रह्मतत्त्व त्यापरते वेगळे कसे आहे, याचे विवरण केलेले आहे.सांगितलेला उपदेश सामान्य श्राेत्यांच्याही लक्षात येऊन त्यांना ताे पूर्णपणे समजावा म्हणून पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगावा लागताे. असे करण्यामध्ये हुशार श्राेत्यांना पुनरुक्ती हाेत आहे असे वाटते.सर्वच संतांच्या वाययात असे हाेत असते. श्रीसमर्थांना याची पूर्ण कल्पना आहे. ते म्हणतात, संदेहवृत्ती ते न भंगे । म्हणाेनि बाेलिलेच बाेलावे लागे । आम्हासी हे घडले प्रसंगे । श्राेती क्षमा करावें ।।37।।
साधकांच्या मनातील संशय सहजी नाहीसा हाेत नाही म्हणून तेच तेच परत सांगण्याचा प्रसंग येताे, हे लक्षात घेऊन श्राेत्यांनी पुनरुक्तीबद्दल क्षमा करावी अशी विनंतीही ते करतात. त्यामुळे श्रीदासबाेधात आणि त्यास अनुसरून असणाऱ्या या नित्यपाठातही अशी द्विरुक्ती अटळच समजली पाहिजे.परमात्वरूप आत्मा आकाशाहूनही विशाल, निर्मळ व निश्चल आहे. ताे दिसत नाही, भासत नाही, त्याला येणे जाणे नाही. ते सर्वव्यापी असल्याने सदैव सन्मुख आणि आकाश व पाताळालाही व्यापून राहते. ते निर्गुण म्हणजे गुणातीत असल्याने नाश न पावणारे आहे. मात्र, त्यातून निर्माण झालेले हे मायारूप जग म्हणजे निर्गुण आणि नाशवंत सगुण यांचे एकत्रित मिश्रण आहे. जसा राजहंस पक्षी दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून बराेबर दूध पिताे आणि पाणी साेडून देताे,