राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

19 Apr 2023 16:46:05
 
gram
 
 
नवी दिल्ली, 18 एप्रिल (आ.प्र.) :
 
सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते गौरवण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या वतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तर काही पुरस्कार केंद्रीय मंत्री सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. खंडोबाचीवाडीचे सरपंच धनंजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ आणि हरित पंचायत श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले. सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच संतोष टिकेकर, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामसेवक अस्लम हुसेन शेख यांनी पुरस्कार स्वीकारला.
Powered By Sangraha 9.0