या साेळाव्या अध्यायात ज्ञानेश्वर गीतेच्या आधाराने दैवी व आसुरी संपत्तीचे वर्णन करीत आहेत. संपत्ती कशाला म्हणतात हेही ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केले आहे.एकमेकास पाेसणारे असे अनेक पदार्थ एकत्र आले की, त्याला संपत्ती म्हणतात. दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारी आहे.निर्भयता, सद्बुद्धी, ज्ञान, याेग यांतील तत्परता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, साैजन्य, अहिंसा, सत्य, क्राेधराहित्य, दया, दाेष टाकून गुण घेण्याची वृत्ती, अनासक्ती, मृदुता, लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, अद्राेह इत्यादि गुण दैवी संपत्तीचे हाेत.दैवी संपत्तीच्या या गुणांत सर्वश्रेष्ठ असा अभय नावाचा गुण आहे. अभय म्हणजे काय ? हे ज्ञानेश्वरांनी विस्ताराने सांगितले आहे. सत्त्वसंशुद्धीं म्हणजे काय हेही ते सांगतात.
राखुंडी जशी जळत नाही किंवा विझतही नाही, वर्षाॠतूतील पूर ओसरला आहे आणि गंगेचे स्वाभाविक स्वरूप स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे प्रेम भाेगण्यास बुद्धी आपल्या रूपात प्रकट हाेते. चांगल्या किंवा वाईट विषयांच्या दर्शनाने चित्तात चलबिचल हाेत नाही.
पती गावाला गेला असता पतिव्रता ज्याप्रमाणे वियाेगदु:ख सहन करते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गाेडी लागल्यावर बुद्धी अनन्य हाेते. हीच सत्त्वशुद्धी हाेय.निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी, त्याप्रमाणे चित्तवृत्ती निष्कामभावाने परमात्म्यास समर्पण कराव्यात.
ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगले कुळ पाहून द्यावी किंवा हा दृष्टांत राहू द्या. ज्याप्रमाणे भगवंतांच्या ठिकाणी लक्ष्मी निरभिमानी हाेऊन स्थिरावली, त्याप्रमाणे अनन्य भावाने याेगाच्या ठिकाणी वतनदार हाेऊन राहणे हा दैवी संपत्तीचा आणखी एक गुण आहे. अशाच वरील अनेक गुणांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी आपल्या नेहमीच्या मार्मिक शैलीने केले आहे.