स्वार्थ साधण्यासाठी लाेक कधी काय करतील हे सांगता येत नाही. विविध प्रकारचे रूप घेऊन किंवा पात्रता नसतानाही आपण पात्र असल्याचे दाखवून लाेक स्वार्थ साधतात.आध्यात्मिक क्षेत्र हे भावनाप्रधान क्षेत्र असल्याने या क्षेत्रात प्रवेश करून भाेळ्या भाबड्या लाेकांना फसवणे, त्यांच्या मनावर राज्य करणे साेपे असते. याची जाण ढाेंग्यांना निश्चितच असते. त्यामुळेच की काय मूठभर का हाेईनात पण ढाेंगी, स्वार्थी, व्यावहारिक लाेक या क्षेत्रात शिरले आहेत. स्वत:च्या जीवनात वर्तनशून्य वागणरे लाेक लाेकांना या क्षेत्रातून मार्गदर्शन करीत आहेत.
माझ्या नावाचा जप करा, मलाच गुरू करून घ्या, मी म्हणताे तेच ऐका, मी म्हणजेच देव हाेय, माझेच चरित्र वाचा, माझ्याच हातून माळ घाला वगैरे वगैरे म्हणणारे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.अशा व्यावहारिक, ढाेंगी लाेकांची सेवा केल्याने किंवा यांचे ऐकून वागल्याने कसल्याही प्रकारचे सुख जीवाला मिळणार नाही. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, ऐसियाची करिता सेवा । काय सुख हाेय जीवा ।। खरे म्हणजे ही केवळ दुसऱ्यांची फसवणूक नाही, तर स्वत:चीही फसवणूक हाेय.
जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448