देह हा देवाच्या प्राप्तीकरिता आहे अशी वृत्ती असावी

17 Apr 2023 19:36:29
 
 

Gondavlekar 
 
एकदा असे झाले की, एका साधूकडे चाेरांनी चाेरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चाेरांना धरून त्या शिष्यांनी खूप चाेप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चाेरांना आणून गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भाेजन दिले. ‘हे असे काय करता?’ म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, ‘तुम्ही तरी काय करता? सर्वचजण देवाच्या घरी चाेरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जाे देह दिला ताे देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिलाय, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चाेरताे आहाेच की नाही !’ म्हणून, विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी.
 
आपण सर्वांनी ‘मी भगवंताकरिता आहे’ असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपाेआप नाहीसे हाेऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी हाेय. संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना,‘अरे, तू वाट चुकलास’ अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदासर्वदा समाधिसुख भाेगीत असतात, आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळताे. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव-अंश हाेता तसा ताे आपल्यामध्येही आहे; त्याने ताे ुलविला, पण आपण ताे झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डाेळ्यांसमाेर ठेवावे.
 
त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि पराेपकार करण्याची तऱ्हा, या गाेष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे; ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन हाेईल.मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली; हेच खरे भक्तीचे फळ आहे.उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. ‘माझ्या देवाला हे आवडेल का?’ अशा भावनेने जगात वागावे, हाच सगुणाेपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, ताे माझ्या मागे आहे, ताे माझे कल्याण करणार आहे, ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना हाेऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी हाेय.आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे.
Powered By Sangraha 9.0