गीतेच्या गाभाऱ्यात

12 Apr 2023 16:06:38
 
पत्र बारावे
 
Bhagvatgita
ठीक आहे.उपादानकारण म्हणजे ज्याचा पदार्थ बनताे ते कारण.उदाहरणार्थ माती हे घटाचे उपादनकारण आहे.या बाबतीत शांकरभाष्यात माेठा मनाेरंजक वाद आहे.शांकरभाष्यात कितीतरी वाद आहेत, त्यापैकी हा वाद महत्त्वाचा आहे.तू असे लक्षात घे की, जेव्हा तर्काने काम भागत नाही तेव्हा (1) माया व (2) वेदप्रामाण्य - या दाेन स्तंभांचा आधार घेऊन शंकराचार्यांनी आपले म्हणणे प्रस्थापित केले आहे.महत्त्वाचा वाद सिद्धांती - ब्रह्म हे जगाचे उपादान कारण आहे.आक्षेपक - तुमचे म्हणणे पटण्यासारखे नाही. तुमचे ब्रह्म आणि जग यात थाेडेतरी साम्य आहे का? ब्रह्म चेतन आहे, तर जग अचेतन आहे. ब्रह्म शुद्ध आहे, तर जग अशुद्ध आहे.
 
अशा परिस्थितीत ब्रह्म हे जगाचे उपादानकारण कसे असू शकेल? मातीपासून कधी सुवर्णपात्र हाेईल काय? दु:खे आणि माेह यांनी हे जग भरलेले आहे.असल्या जगाचे कारणही तशाच प्रकारचे असले पाहिजे.ब्रह्माला दु:ख नाही, माेह नाही. अशा परिस्थितीत ब्रह्म हे जगाचे उपादानकारण कसे असू शकेल?
 
सिद्धांती - कार्य हे उपादानकारणासाररखेच असले पाहिजे असे कसे म्हणता येईल? माणूस चेतन असताे, तर त्याच्यापासून उत्पन्न हाेणारे नख, केस अचेतन असतात.
 
आक्षेपक - या दाखल्यांचा काय उपयाेग? नख, केस उत्पन्न हाेतात ते काय आत्म्यापासून उत्पन्न हाेतात? नख, केस शरीरापासून उत्पन्न हाेतात. शरीर अचेतन आहे.
 
सिद्धांती - शरीर अचेतन त्याप्रमाणे त्यापासून उत्पन्न झालेली नखे व केस हे अचेतन - हे म्हणणे कबूल आहे.पण कार्य व कारण यात भेद असू शकताे हे तुम्ही मान्य केले म्हणजे आमचे काम झाले.
 
आक्षेपक - कार्य हे पूर्णपणे कारणासारखेच असले पाहिजे असे आमचे मत आहे.
 
सिद्धांती - मग त्याला कार्य कशाला म्हणता? कारण व कार्य ह्यांत फरक नसेल तर कारणच कायम राहते असे का म्हणत नाही?
 
आक्षेपक - सर्वच बाबतीत कार्य व कारण यांत सारखेपणा नसेल पण महत्त्वाच्या बाबतीत तरी सारखेपणा नकाे का? सिद्धांती - महत्त्वाची बाब काेणती हे काेणी ठरवावयाचे? तुम्ही असे लक्षात घ्या की, सत्ता हा ब्रह्माचा धर्म आहे. आणि सत्ता हा जगाचा देखील धर्म आहे.
 
आक्षेपक - हे पाहा ब्रह्म हे चेतन, शुद्ध व निर्गुण आहे व जग हे अचेतन, अशुद्ध व गुणात्मक आहे. इत्नया भिन्न स्वरूपाचे ब्रह्म जर जगाचे कारण असेल तर जगाच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मच हाेते, जग नव्हते असे आपण म्हणू. पण तुम्ही तर सत्कार्यवादी आहा. उत्पत्तीच्या पूर्वीदेखील कार्य असतेच असे म्हणणारे आहा.
 
सिद्धांती - अहाे, जग उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते या म्हणण्यात काय अर्थ आहे? उत्पत्तीपूर्वी जग हाेते पण ते कारणरूपाने हाेते. आजसुद्धा वस्तुत: जग कारणरूपानेच आहे. कारणाशिवाय जगाला अस्तित्व नाही, असे श्रुतींचे मत आहे.
 
आक्षेपक - प्रलयाच्या वेळी जगाचे गुण जातात की राहतात? जात असले तर कुठे जातात? राहात असले तर ब्रह्माशिवाय कुठे राहतात?
Powered By Sangraha 9.0