संसारात अडकलेल्या जीवाला त्याचा खरा परिचय व्हावा आणि हा जीव ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, मीपणा, स्वार्थ, लाेभ, माया आदितून बाहेर पडावा म्हणून आपण प्रयत्न करत असतांनाही आपल्या प्रयत्नांना पाहिजे तेवढे यश आले नाही. संसारात अडकलेल्या जीवाकडे पाहून आपणाला दु:ख हाेत आहे.या दु:खाला पांडुरंगा तूच नाहीसे कर, अशी विनंती करतांना तुकाराम महाराज म्हणतात, करा नारायणा । माझ्या दु:खाची खंडना ।। स्वत:च्या जीवनात अनेक अडीअडचणी असतांनाही त्याचे दु:ख न मानता इतरांना त्यांचा खरा परिचय हाेत नसल्याने लाेक दु:खी आहेत.
म्हणून लाेकांच्या या दु:खाबाबत दु:ख मानणे आणि या सर्वांना या दु:खातून मुक्त हाेण्याचा मार्ग दाखविण्याची विनंती आपल्यासर्वेश्वराजवळ करणे ही साधी बाब नाही.अर्थात स्वत:साठी कांही न मागता इतरांच्या भल्यासाठी मागणे हा फार माेठा त्याग व फार माेठी सेवा आहे. संसारात अडकलेला जीव भाेगाला महत्व देत असल्याने त्याला त्यागाची परिभाषा सहजासहजी समजणे अवघड आहे.असाे, आपणाला असा त्याग करता नाही आला तरी चालेल, मात्र आपण भाेगात अडकता कामा नये.
जय जय राम कृष्ण हरी -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448