विश्वरूपाच्या दर्शनाने चकित झालेला अर्जुन भगवंतांना म्हणताे आहे की, देवा तुम्ही परब्रह्म आहात. तुम्ही ॐकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडचे आहात आपल्या ठिकाणचा शाेध वेद घेत आहेत. आपण आकारमात्राचे घर आहांत. विश्वरूपाची खारीण आहात.आपण अधिकारी, गहन व अविनाशी आहात. देवा, तुम्ही धर्माचा जिव्हाळा आहात.छत्तीस तत्त्वांहून वेगळे असे सदतिसावे तत्त्व देवा तुम्ही आहांत.देवा, तू आदि, मध्य व अंतररहित आहेस.तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत. म्हणजे असे की, सर्वांचे हातपाय तूच आहेस.चंद्र आणि सूर्य या डाेळ्यांनी तू पाहताेस. काेणावर कधी रागवताेस, तर काेणाचे कृपाकटाक्षाने रक्षण करताेस.
देवा, तुझे हे रूप म्हणजे प्रलयकालाच्या अग्नीचे ताेंड आहे. ज्वालांचा भडका उठून दात व दाढा चाटीत तुझी जीभ वळवळत आहे. स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष, दहा दिशा इत्यादीत तूच भरला आहे; पण तू सर्वत्र एवढा व्यापला आहेस की, तुला मी ओळखावे कसे? तुझे आकलन कसे करून घ्यावे? तुझ्या या रूपाची प्रखरता सहन हाेत नाही. सुख दूरच राहिले, पण देवा, हे जग कसेतरी टिकून राहिले आहे. तुझे दर्शन झालेअसता भय व दु:ख नाहीसे हाेते; पण हे विश्वरूप सुखदायक वाटत नाही. तुझे खरे रूप दिसत नाही ताेपर्यंत विषयसुख चांगले वाटते आणि तुझे दर्शन झाले की, बाह्य विषयांचा कंटाळा येताे.