संसारात अडकलेला जीव कळत न कळत ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ आदिच्या जाळ्यात अडकताे.या जाळ्यात अडकलेला जीव प्रसंगानुरूप का हाेईना पण ताणतणावात येताे. अर्थात अधून मधून बऱ्याचवेळा मानसिक दडपणाखाली येताे. मानसिक दडपण जावे म्हणून ताे कांही वेळा मनाेरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेताे.यातूनही जेव्हा त्याला समाधान मिळत नाही, तेव्हा ताे आतल्या आत स्वत:च्या मर्यादा, जबाबदाऱ्या, कर्तव्य आदिचा विचार करू लागताे. हा विचार त्याला त्याच्या परीचयाची आठवण देऊ लागताे. त्याचा असा विचार त्याला हळूच शांततेचा मार्ग सुचवताे. शांततेचा मार्ग म्हटले की भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग इ. त्याला आठवू लागतात. कांही लाेक मुळातच भजनाच्या गाेडीचे असतात. भजन हे तणावमुक्तीचे प्रभावी माध्यम असले तरी ते बऱ्याच अंशी भजनकर्त्याच्या आचार- विचारावर अलवंबून असते. भजनकर्ताच जर निव्वळ व्यावहारिक असेल तर भजनकर्त्यालाही व श्राेत्यालाही भजनाचा याेग्य ताे लाभ हाेत नाही. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, वाया गेलें तें भजन । उभयंता लाेभी मन ।। जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448