ज्ञानी माणसाच्या वर्णनापेक्षा अज्ञानाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी इतक्या विस्तृत रीतीने का केले आहे? हे ध्यानात घेण्यासारखे आहे. ज्ञानी माणसाचा शाेध काेठे घ्यावयाचा? ताे काेठे सापडावयाचा? ज्ञानी माणसाची लक्षणे पडताळून काेठे, कशी पाहावयाची? याउलट अज्ञानी माणसे जागाेजागी भेटतात. अज्ञानाचा आढळ अनेक ठिकाणी हाेताे.सर्वसामान्य माणसास ज्ञानापेक्षा अज्ञानच परिचयाचे असल्यामुळे हे अज्ञान त्याच्या लवकर ध्यानात येते व मनात ठसते. हा अज्ञानी मनुष्य गुरुभक्तीला कंटाळताे.गुरुकुळाची त्याला लाज वाटते.विद्या शिकून झाल्यावर ताे गुरूवरच उलटताे. त्याच्या वाचेस प्रायश्चित्त म्हणजे गुरुभक्ताचे माहात्म्य गाणे.हा अज्ञानी मनुष्य शरीराने कर्मे करण्याबद्दल आळशी असताे. त्याच्या मनात विकल्प असताे.
आतबाहेर ताे अमंगल असताे. कुत्रे जसे अन्न उघडे किंवा झाकलेले पाहात नाही, त्याप्रमाणे द्रव्याच्या बाबतीत हे आपले, हे परके असे ताे पाहात नाही. स्त्रीसंगाविषयी ताे कसलाच विचार करीत नाही. पाप करण्यास त्याला लाज वाटत नाही. पुण्याविषयी ताे नि:संग असताे. केवळ धनाचीच इच्छा त्याच्या मनात असते. थाेड्या स्वार्थासाठी ताे निश्चयापासून ढळताे. भयाने घाबरून जाताे. दु:खाने त्रस्त हाेताे. त्याचे मन भरकटत असते. सरड्याप्रमाणे त्याचे भटकणे निरर्थक असते.माजलेल्या वावटळीप्रमाणे ताे काेठे स्थिर राहात नाही. माकडाप्रमाणे ताे चंचल असताे. त्याच्या मनाचा निग्रह नसताे. निषिद्ध कर्माला ताेंड देण्यास ताे भीत नाही. व्रतांना ताे मध्येच माेडताे.स्वधर्माला लाथेने झुगारताे. कर्माचा आग्रह धरत नाही.त्याला पापाचा कंटाळा नसताे. ताे पुण्याला आश्रय देत नाही. त्याला लाज वाटत नाही.