पैं गा जाे ययापरी। जन्मेंचि जन्म निवारी। मरणें मृत्यु मारी। आपण उरे ।। 13.553

24 Mar 2023 14:56:17
 
 

Dyaneshwari 
 
ज्ञानी माणसाचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण ज्ञानेश्वर या ओवीत सांगत आहेत. जन्म, मृत्यू, राेग, दु:ख. जरा म्हणजे म्हातारपण ह्यांचे सतत स्मरण असावे असे आग्रहाने प्रतिपादन येथे केले आहे.ज्याप्रमाणे संपत्तीच्या ठेव्यावर पिशाच लक्ष ठेवून असते, भिंत वाकडी हाेऊ नये म्हणून गवंडी जसा ओळंबा लावताे, सर्पाच्या मनातील वैर जसे निरंतर असते, डाेळ्यातला खडा जसा न विरघळता नित्य सलत राहताे, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य मागील जन्माचे दु:ख विसरत नाही. जन्माचा ताे तिरस्कार करताे. संभावित मनुष्यास जसा अपमान सहन हाेत नाही. त्याप्रमाणे जन्मास आल्याची लाज त्याला कधी साेडत नाही. खूप वर्षांनी मृत्यू येणार असला तरी ताे आत्ताच पुढे उभा राहिला आहे असे समजून ताे सावध असताे. नदीमधील अथांग पाणी पाहून पाेहणारा मनुष्य काठावर असताना बळकट कासाेटा घालताे.
 
युद्धभूमीवर जाण्यापूर्वी जशी मनाची तयारी करावी किंवा शस्त्राचा घाव घालण्यापूर्वी ढाल पुढे करावी, उद्याचा मुक्काम वाटमाऱ्यांचा आहे, हे आधीच जाणून घ्यावे, जीव जाण्यापूर्वीच औषधासाठी धावाधाव करावी, याप्रमाणे ज्ञानी पुरुष आधीच सावध असताे.एखाद्याशी हाडवैर निर्माण झाले की मनुष्य नेहमी हातात शस्त्र घेऊनच उभा असताे. वाङ्निश्चय झालेली मुलगी जशी माहेराविषयी उदासीन बनते, सासरी जाण्याविषयी ती उत्सुक असते, संन्यासी जसा आधीच सर्वांविषयी बेिफकीर असताे, त्याप्रमाणे पुढे येणाऱ्या मरणाच्या अगाेदरच मरणाचा विचार करून ताे उदास झालेला असताे. असा हा ज्ञानी पुरुष जन्माचे व पुढील मरणाचे सतत स्मरण करीत असताे.
Powered By Sangraha 9.0