पत्र नववे
हल्लीच्या सुधारलेल्या 20 व्या शतकात काही लाेक दुसऱ्यांच्या बायका पळवितात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात.राम-राज्यात रावणाला जबर शिक्षा हाेते. त्याप्रमाणे आपणाला अभिप्रेत असलेल्या राम-राज्यात अशा सवाई रावणांना जबर शिक्षा झालीपाहिजे.एक-बाणी, एक-वचनी आणि एक-पत्नी अशी 3 विशेषणे रामाला लावली जातात. तू विचारतेस की, यापैकी काेणते विशेषण श्रेष्ठ आहे? अग, तीन पायांचे एक स्टूल आहे. या तीन पायांपैकी काेणता पाय श्रेष्ठ आहे, असा प्रश्न विचारण्याप्रमाणेच हा प्रश्न आहे.आपण हल्ली सुधारणेच्या किती तरी गाेष्टी बाेलताे. हे सर्व विचार एकत्र केले तर ते एक रामायण हाेईल. पण, जाेपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, असल्या समाजाच्या मूलभूत गरजा परिपूर्ण हाेत नाहीत, ताेपर्यंत त्यात राम नाही, असे ते रामायण हाेईल.
तू रामायण वाच, गीता वाच. तुला एक महान संदेश मिळेल की, ‘‘ममता म्हणजे समता व देवता म्हणजे मानवता.’’ तू म्हणतेस की, ‘‘गीता वाचून मला वाटू लागले आहे की, पती व पत्नी यांनी एकरूप व्हायला पाहिजे.’’ तुझे म्हणणे बराेबर नाही. पती व पत्नी यांनी एकरूप न हाेता अनुरूप झाले पाहिजे.’’ तू एक किलाे साखर आणलीस आणि त्याचे दाेन भाग करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेस. नंतर ते दाेन्ही भाग एकत्र ेले. हे दाेन्ही भाग एकत्र झाल्यानंतर पूर्वीचा निम्मा भाग काेणता व दुसरा निम्मा भाग काेणता, हे ओळखता येत नाही, ही झाली एकरूपता! दुसरे उदाहरण असे की, डब्यात ठेवली साखर आणि बरणीत ठेवला लिंबाचा रस! लिंबाचा रस आणि साखर यांचे मिश्रण केले म्हणजे लिंबाच्या रसाला किंवा साखरेला स्वतंत्र अस्तित्व न राहता निराळा पदार्थ तयार हाेईल. पण, त्या पदार्थांची चव घेतल्यानंतर आपणाला कळून येईल की, या नवीन पदार्थात लिंबाचा आंबटपणा आहे आणि साखरेची गाेडी पण आहे. लिंबू आणि साखर यांचे गुणधर्म शिल्लक राहून एक निराळा पदार्थ तयार झाला आहे.
याला म्हणतात अनुरूपता.ही दाेन उदाहरणे पाहून तुला कळेल की पती-पत्नी यांनी एकरूप न हाेता अनुरूप असले पाहिजे.
गीता वाचून आपणाला अनुभव येताे की, कृष्णमाता आपल्या हृदयात आहे. त्या मातेचे बाेट धरून आपण चालताे आहाेत. ते बाेट जाेपर्यंत आपण धरले आहे ताेपर्यंत इकडच्या तिकडच्या गाेष्टी देण्याबद्दल कृष्णमातेला बाेलताे. ती माता म्हणते, ‘‘देऊ,’’ पण जर का चुकून जीवनाच्या गर्दीमध्ये मातेचे बाेट सुटले व आपण इकडे तिकडे हिंडू लागलाे, तर आपणाला बाकीच्या साऱ्या गाेष्टी नकाेशा हाेतात व कृष्णमातेसाठी आपण रडू लागताे.एक सुंदर गाेष्ट आहे. एक लहान मुलगा आपल्या आईबराेबर जत्रेला गेला हाेता. बरीच खेळणी अन् मिठाई विक्रीसाठी हाेती.ताे मुलगा आईचे बाेट धरून चालला हाेता व ताे हट्ट करत हाेता की, ‘‘मला हे खेळणे दे, ते खेळणे दे.’’ आई म्हणत हाेती, ‘‘देऊ!’’