तेणें माझा जी माेह जाये। एथ विस्माे कांहीं आहे। तरी उद्धरलाें कीं तुझे पाये। शिवतले आहाती ।। 11.68

20 Mar 2023 14:18:56
 
 
 

Dyaneshwari 
श्रीकृष्णांनी आपणांवर प्रसन्न व्हावे म्हणून अर्जुन नाना प्रकारांनी त्यांच्याशी सूत जुळवीत आहे.आपला अहंभाव कृष्णामुळे नष्ट झाला हे तर खरेच. पण याहीपूर्वी श्रीकृष्णांनी आपले रक्षण कसे केले याचा संदर्भ अर्जुन देऊ लागला. मागे एकदा पांडव लाक्षागृहात जळून मरण्याचा याेग आला असता या देवानेच त्यांना वाचविले. त्यावेळी केवळ स्थूलदेहासच भय हाेते.आता या युद्धभूमीवर अर्जुनाच्या चित्तासही ग्लानी आली हाेती. पण श्रीकृष्णांच्या कृपेने ती दूर झाली.आणखी एक उदाहरण देताना अर्जुन म्हणताे की, देवा, दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझ्या बुद्धीची पृथ्वी उचलली व ती समुद्रात टाकली. पण देवा, तुम्ही तुमच्या सामर्थ्याने वराह अवतार धारण करून तिला वर काढले. याप्रमाणे कृष्णा, तुमचे माेठे उपकार माझ्यावर आहेत.
 
तुमच्या उपकाराच्या कृत्यांची वर्णने मी माझ्या वाणीने कशी करू? पण एवढे मात्र नक्की की, तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. देवा, हे तुमचे कृत्य व्यर्थ गेले नाही. त्याला चांगले फळ आले आहे. कारण त्यामुळे माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले आहे. देवा, आनंदरूप सराेवरातील तुमचे कमळासारखे डाेळे मला राहण्यासाठी घर म्हणून प्राप्त झाले आहेत. असे असूनही मी भ्रांतीने ग्रासला गेलाे.ही गाेष्ट कशी काय झाली? वडवानळ समुद्राच्या पाण्याने विझला जात नाही. मग मृगजळाचा काय उपयाेग? देवा, मी तर तुमच्या कृपेच्या गाभाऱ्यात बसून ब्रह्मरसाचे भाेजन करीत आहे. माझी भ्रांती दूर हाेईल. माझा उद्धार हाेईल, असे मी तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगताे.
Powered By Sangraha 9.0