इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवी देह हा निश्चितच श्रेष्ठ आहे, यात शंका नाही.त्यातल्या त्यात या देहात पुरुष स्त्रीपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजताे. स्वत:ला श्रेष्ठ समजणारा पुरुष नराचा नारायण करण्यात मात्र मागे राहताे.नारायणत्व तर साेडाच; पण बरेच नर, माणूस म्हणूनही जगत नाहीत. अर्थात अमानवता जाेपासणाऱ्यांची संख्या खूप आहे.आई-वडिलांचा मान सन्मान न करणे, पत्नीला अर्धांगिनी म्हणून न वागवणे, तंबाखू-बिड्या ओढणे, मद्य प्राशन करणे, खून, बलात्कार करणे, हुंडाबळीस कारणीभूत हाेणे, असे प्रकार हा नर सर्रास करताे.
स्वार्थ, अहंकारामुळे जाे नर कामवासनेच्या पूर्तीसाठी नीतिनियम पायदळी तुडवताे, सत्ता-संपत्तीसाठी आई-वडिलांवर अन्याय करताे, भाैतिक सुखासाठी वाट्टेल ते करताे असा नर गाढवापेक्षाही हीन समजावा.हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ।। चांगल्या मार्गाने म्हणजेच सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून माणूस वागला, तर ताे नराचा नारायण हाेऊ शकताे. हे केवळ कल्पनेने हाेत नाही, तर यासाठी कृती करावी लागते.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448