पत्र नववे
गीतेच्या बाबतीत अनुभवाला फार किंमत आहे. पुष्कळदा असे दिसते की, अंगठ्याएवढा अनुभव नसताना देखील गीतेवर खूप माेठे प्रवचन दिले जाते.आनंद-रामायणामध्ये एक मजेशीर गाेष्ट आहे. एकदा कैकेयीला वंदन करण्यासाठी सीता आली असताना कैकेयी म्हणते, ‘‘सीते’’ तू रावणाकडे बरेच दिवस हाेतीस. अगं, ताे रावण हाेता तरी कसा?’’ सीता म्हणते, ‘मी रावणाला पाहिला नाही. मी फ्नत त्याचा अंगठा पाहिला आहे.’’ नंतर सीतेने रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून दाखविले.मग कैकेयीने त्या अंगठ्याच्या आधाराने रावणाचे संपूर्ण चित्र तयार केले व जाहीर केले की, हे चित्र सीतेने काढले आहे व ती रावणाचा ध्यास करते आहे.
तू असे लक्षात घे की, कैकेयी जरी कमालीची दुष्ट हाेती तरी देखील तिला सीतेने काढलेल्या अंगठ्याचा आधार घ्यावा लागला. पण परमार्थात किती तरी लाेक अंगठ्याचा देखील अनुभव नसताना सारे चित्र तयार करीत असतात.गीतेत अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला आहे की, स्वत:ची इच्छा नसताही बळजबरी केल्याप्रमाणे मनुष्य पाप करताे ते काेणाच्या प्रेरणेने? अथ केन प्रयु्नताेऽयं पापं चरति पुरुष:। अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियाेजित:।। (3-36) भगवान गाेपालकृष्णांनी उत्तर दिले की, या बाबतीत काम व क्राेध ही कारणे आहेत.ज्याला परमार्थ करावयाचा आहे व ज्याला गीतेची शिकवण अंगी बाणवायची आहे त्याने कामक्राेधावर विजय मिळविला पाहिजे.काम-क्राेधाच्या बाबतीत तू असे लक्षात घे की, कामापेक्षाही क्राेधाचा जाेर माेठा असताे. वय हाेऊ लागले की काम कमी हाेताे, पण क्राेध मात्र कमी हाेत नाही.
विश्वामित्र एवढा माेठा मनुष्य. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मर्षी-पद मिळविले; पण वसिष्ठ त्याला ब्रह्मर्षी म्हणेनात. हे पाहून विश्वामित्राचा क्राेध अनावर हाेई. एकदा अत्यंत क्राेधाविष्ट हाेऊन विश्वामित्राने एक माेठा दगड घेतला व ताे वसिष्ठाच्या आश्रमाजवळ लपून बसला. त्याचा बेत असा हाेता की, ताे दगड वसिष्ठाच्या डाे्नयात घालून त्याचा शेवट करावयाचा.वसिष्ठ व अरूंधती अंगणात बाेलत बसली हाेती. पाैर्णिमेचे स्वच्छ चांदणे पडले हाेते.अरूंधती म्हणाली, ‘‘चांदणे किती निर्मळ अन् सुंदर पडले आहे!’’ वसिष्ठ म्हणाले, ‘‘अगदी विश्वामित्राच्या तपश्चर्ये सारखे.’’ अरूंधती म्हणाली, ‘‘म्हणजे विश्वामित्राची तपस्या तुम्हाला मान्य आहे?’’ वसिष्ठ म्हणाले, ‘‘तपस्या मान्य आहे; पण विश्वामित्राचा अद्यापही क्राेध गेला नाही, ताेपर्यंत ताे ब्रह्मर्षी कसा हाेईल?’’ हा संवाद ऐकून विश्वामित्राला आपली चूक कळून आली.गीतेने काम-क्राेधावर फार काेरडे ओढले आहेत. अनुभव म्हणून तू असे लक्षात घे की, क्राेध कमी करण्याची आपण खटपट करू लागलाे की, काम देखील कमी हाेताे.