आत्म्याचे स्वरूप न ओळखल्यामुळे अर्जुन शाेक करीत आहे. जन्म आणि मरण यांचे चक्र सतत चालू राहणार आहे. हे त्यास समजावून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की, सूर्याचे उगवणे व मावळणे हे सतत चालूच असते. महाप्रलय झाला की जगताचा संहार हाेताे. जन्ममृत्यू यांतून काेणाचीच सुटका नाही.अर्जुना, तुला हे माहीत असताना तू व्यर्थ शाेक का करताेस? अर्जुनाने शाेक साेडावा म्हणून आणखी एक विचार तत्त्वरूप असा गीतेत सांगितला आहे. सर्व सृष्टी प्रथम अव्यक्त हाेऊन म्हणजे लीनदशेत असते.नंतर ती पुन्हा व्यक्त हाेऊन म्हणजे प्रकट हाेऊन नामारूपाला येते. शेवटी पुन्हा ती अव्यक्ततात सामावली जाते. या राहटीचा शाेक करण्यात काय अर्थ आहे?
ज्ञानेश्वरांनी या तत्त्वांचे स्पष्टीकरण करताना सांगितले आहे की, ही सर्व प्राणिसृष्टी निर्माण हाेण्यापूर्वी आकाररहित हाेती आणिनिर्मितीनंतर ती आकाराला आली. या प्राण्यांचा जेव्हा नाश हाेईल तेव्हा ते सर्व आपल्या मूळ निराकार स्थितीतच जाऊन पाेहाेचतील.बाकी उत्त्पत्ती व नाश हा एक भासच म्हणावा लागेल. झाेपलेल्या माणसास स्वप्न दिसते, त्याप्रमाणे आत्मतत्त्वाच्या ठिकाणी भ्रमामुळे प्राणिमात्रांचे आकार दिसतात. साेन्याहून निराळा असणारा पुरुष साेन्याचे अलंकाररूप पाहू शकताे. वास्तविक ते साेनेच असते.याप्रमाणे सर्व सृष्टी आकाशातील अभ्रांप्रमाणे व्यर्थच असते. म्हणून अर्जुना, जे अस्तित्वात नाही त्यासाठी तू शाेक करीत आहेस. मग जे हे दिसत आहे ते काय आहे? ज्ञानेश्वरांच्या मते ती एक आत्मतत्त्वाचीच प्रेमलीला आहे.