तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा मी अनेक ठिकाणी शब्दश: अर्थ काढण्यापेक्षा सामाजिक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाजाला नीतिमत्तेच्या मार्गावर आणण्याची महाराजांची इच्छा हाेती. लाेकांनी सकारात्मक दृष्टी जाेपासावी, एकमेकांवर प्रेम करावे, समता, बंधुतेला वृद्धिंगत करावे, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या महाराजांच्या अभंगाचा अर्थ सामाजिक दृष्टिकाेनातून काढला, तर चुकीचे हाेणार नाही, असे मला वाटल्याने मी हे प्रेमळ धाडस करीत आहे.संसारात अडकलेल्या जीवाला इच्छा नसतानाही इतरांच्या सहवासाने म्हणा किंवा नैसर्गिकरित्या म्हणा कळत न कळत ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार बरे वाटूलागतात.
अशा बऱ्या वाटणाऱ्या ईर्षा, द्वेष, मत्सराची भूकही भागवावी वाटू लागते. त्याचे असे वाटणे त्याला कधीच चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. पण, जाे जीव स्वपरिचित झाला किंवा संत सहवासात आला ताे अशा भुकेला भाेग समजून यापासून दूर राहताे.आपण ज्ञानाेबा-तुकाेबांच्या सहवासात असल्याने आपणाला ही भूक, भाेग दिसायला हवी. ही भूक, भाेग दिसू लागणे म्हणजेच आपण आत्माेन्नतीच्या मार्गावर पाऊल टाकणे हाेय.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448