भगवंतांचे विराट विश्वरूप पाहून भांबावलेल्या अर्जुनाने त्यांची मनापासून स्तुती केली. ताे म्हणाला, देवा तुमचे हे अवाढव्य रूप पाहून माझे धैर्य नाहीसे झाले.तरी विश्वरूप दिसले हे काय थाेडे झाले? तुम्ही मला आपल्या बाेधातच गुंतवून टाकले आहे. माझा जीव विश्रांती घेण्यासाठी इकडे तिकडे धावाधाव करीत हाेता, पण त्याला या विश्वरूपातही विश्रांतीसाठी काेठे जागा दिसेना.या विश्वरूपाच्या महामारीने सर्व जीवनच संपले आहे.श्रीकृष्णा, आता आम्ही काय बाेलावे? काय करावे? आणि रहावे तरी कसे? मृत्यूचे भांडे ुटावे तशी तुझी विशाल मुखे माझ्या डाेळ्यांपुढून सरकत आहेत.आणखी एक सांगताे की, प्रलयकाळी शस्त्रांची दाट कुंपणे लागावीत, त्याप्रमाणे तुझ्या दातांची व दाढांची येथे गदझाली आहे.
हे दात व या दाढा यांना तुझे दाेन ओठही झाकू शकत नाहीत. तक्षकसर्प हा मूळचाच भयंकर विषारी आणि त्याच्या ताेंडात आणखी विष ओतावे. अमावस्येची रात्र ही आधीच काळी व तीत पिशाच्च नाचू लागावे किंवा वज्राग्नी हा दाहक खरा, पण त्याने अग्नीचे अस्त्र धारण करावे, याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची मुखे मूळचीच भयंकर असून त्यातून आवेश ओसंडत आहे. असे वाटते की, ताे आवेश नसून आमच्यावर मरणाचे लाेंढेच आले आहेत.प्रलयकाळचा प्रचंड वारा, महाप्रलयाचा अग्नी एकत्र येतील, तेव्हा काय जळणार नाही? देवा, संहार करणारी तुझी ही मुखे पाहून माझे धैर्य तर नाहीसे झाले आहेच, पण मला वेड लागायची पाळी आली आहे. एवढेच नव्हे, तर माझी मला ओळखही पटेनाशी झाली आहे. विश्वरूप डाेळ्याने जरासे पाहिले ताेच सुखाचा दुष्काळ पडला म्हणून तू हे रूप आवरून घे.