या एका महत्त्वाच्या ओवीत भगवंतांचा उपदेश व बाेध ऐकून अर्जुन किती कृतार्थ झाला याचे माेठे सुरेख वर्णन आले आहे. अर्जुन म्हणताे की, आज माझे आयुष्य सफल झाले. दैवयाेगाने चांगले दिवस प्राप्त झाले. कारण देवाच्या मुखाने मी हा अमृतमय बाेध ऐकला.भक्तांचा आत्मा प्रेमाने आपल्याशी कसा एकजीव हाेताे याचे वर्णन करताना भगवान म्हणतात की, या भक्तांनी माझ्याशिवाय बाकीचे सर्व व्यर्थ मानले आहे.अर्जुना, अशा माझ्या प्रेमळ भक्तांपुढे मशाल धरून मीच चालत असताे. मध्येच या भक्तांपुढे अज्ञानाची रात्र हाेते.दाट काळाेख पसरताे.अशा वेळी या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून भक्तांसाठी ज्ञानाचा उदय करणे हे माझे काम आहे. भक्तांना प्रिय असणारा पुरुषाेत्तम अर्जुनाला असे म्हणाल्यावर ताे बाेलला की, देवा, माझे मन आता शांत झाले आहे.
माझ्या मनातील जन्म-मरणरूप कचरा तुम्ही दूर केला आहे. देवा, मी आता आईच्या पाेटातील बालक राहिलाे नाही; कारण आत्मज्ञानाने माझा नवा जन्म झाला असून माझे जीवित सर्वस्व आज माझ्या हाती आले आहे. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली. मला चांगले दिवस आले.कारण आज देवाच्या कृपेने आणि मुखाने मी उपदेश ऐकला. या वाक्यरूपी प्रकाशामुळे माझ्या आतील अंधार व बाहेरील काळाेख हे सर्व नाहीसे झाले. म्हणूनच देवा, आज मी तुझे रूप खराेखर पाहत आहे. जगन्नाथा, सर्वश्रेष्ठ ब्रह्म हा तूच आहेस. तू अतिशय पवित्र आहेस. ब्रह्मादि देवांचे तूच आराध्य दैवत आहेस.