प्रत्येकाला ज्ञान मिळविण्यासाठी जाणत्या माणसाकडून शिकावे लागतेच. असा जाणता माणूस त्याचा गुरूच हाेताे. विद्यार्थ्याला त्याचा शिक्षक गुरू असताे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या क्षेत्रात त्याला काम करावयाचे असेल त्या क्षेत्रातील पारंगत व्यक्ती गुरू हाेते. खेळाडूला त्या खेळातील प्रथितयश खेळाडू, व्यापार शिकणाऱ्याला यशस्वी व्यापारी, शेती करणाऱ्याला अनुभवी शेतकरी, तर नाेकरी करणाऱ्याला त्याचा वरिष्ठ गुरुपदी प्रस्थापित करावा लागताे. त्याच्याकडून ज्ञान घ्यावे लागते.ते सर्व ज्ञान झाले आणि आणखी ज्ञानार्जनाची इच्छा असली, तर त्या पहिल्या गुरूहून श्रेष्ठ असा दुसरा गुरू करावा लागताे.थाेडक्यात, ज्याचा जाे व्यवसाय असेल त्यातील त्याचा गुरू वेगवेगळा असताे. स्वाभाविकच जीवनाची अनेक क्षेत्रे असल्याने असे अनेक गुरू असतात. त्यांचे विचार भिन्न भिन्न असतात.
पण हे केवळ त्या विषयाचे ज्ञान देणारे असे मर्यादित स्वरूपाचे गुरू आहेत, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात, या सगळ्याहून माेक्षाचा जन्म खऱ्या अर्थाने सफल करण्याचा मार्ग दाखविणारा गुरू या सर्वांहून वेगळाच आणि श्रेष्ठ असताे. केवळ अशा माेक्षदात्या गुरूलाच सद्गुरू म्हणता येईल.परमार्थमार्ग दाखविणारीही काही मंडळी स्वत:ला गुरू म्हणवितात; पण त्यांना प्रखर उपासनेचा आधार नसताे. शिवाय सत्कर्माची शिकवण ते जरी दुसऱ्याला सांगत असले तरी स्वत: संपूर्ण सदाचरणी आणि विरागी नसतात.अशा व्यक्तींना अज्ञानाने काही लाेक सद्गुरू समजतात; पण त्यांना साधनांचा, उपासनेचा आणि वैराग्याचा आधार नसल्याने त्यांचे गुरूपद कधीच अढळ नसते. त्यांचे गुरूपद काही काळातच विलयास जाते. काही वेळा माणसे परधम ार्चा गुरू करतात आणि मग मानसिक द्वंद्वात सापडून त्यांची काेंडी हाेते. यासाठी साधकाने आपल्या स्वधर्माशी सुसंगत व विवेकी, वैराग्यपूर्ण निर्लाेभी आणि परमार्थी असाच गुरू करावा.