गीतेच्या गाभाऱ्यात

20 Feb 2023 16:15:20
 
 

Bhagvatgita 
 
पत्र पाचवे श्रीकृष्णांना सांगावयाचे आहे की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय-हे एकच आहेत. ज्याला कळले ताे शहाणा! (एकं सांख्यं च याेगं च य:पश्यति स पश्यति) गीतेचा सखाेल अभ्यास केला म्हणजे असे वाटू लागते की, नि:संग निष्काम व्हावे। अहंकाराते त्यजावे। कर्तव्यकर्म करावे। हेचि गीतामृत।। गीतेने कर्तव्यकर्म करण्यावर फार जाेर दिला आहे.ही कर्तव्यकर्माची तिवई तीन पायांवर अधिष्ठित आहे. हे तीन पाय म्हणजे (1) नि:संगता (2) निष्कामता (3) निरहंकारिता.तू म्हणतेस की, ज्ञानाेत्तर कर्म नाही याचा अर्थ काय? लाैकिक अर्थाने विचार केला तर मनुष्याला मरेपर्यन्त कर्म सुटत नाही. नि:संगता, निष्कामता व निरहंकारिता हे तीन गुण प्राप्त झाले म्हणजे आपण जे कर्म करताे तेदेखील अकर्म हाेते.
 
ज्ञानयाेग किंवा कर्मयाेग काय त्यामध्ये वरील तीन गुण नितांत आवश्यक आहेत. म्हणून गाेपाळकृष्ण म्हणतात की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय, हे दाेन्ही एकच आहेत हे ज्याला कळले ताे शहाणा! गीतेने ज्ञान, कर्म, भ्नती यांचा समन्वय केला आहे.कर्माची जूट, ज्ञानाची लूट आणि भ्नतीची मूठ म्हणजेच गीतेची शिकवण अतूट! अहंकाराला निराेप देऊन, आस्नतीला रामराम ठाेकून काहीही न मागता कर्तव्यकर्माची पुष्पे तू देवावर वाहा म्हणजे देव तुझा दास हाेईल.‘‘न मागे तयाची, रमा हाेय दासी’’ हा जीवनाचा महान संदेश आहे.तू अंतरंगातील दिव्य श्नतीची ओळख करून घे म्हणजे तुझ्या हृदयात आनंदाची बाग फुलेल, गुलाबाचा सुगंध दरवळेल, नेवाळीची फुले लाजून चूर हाेतील, जाई-जुई आल्हाद देतील.
 
प्राज्नताच्या झाडाखाली सुगंधी फुलांचा सडा पडेल, चाफ्याचा घमघमाट येईल आणि अशा वेळी गळ्यात तुळशीमाळ घातलेली, हातात कमळ घेतलेली देवाची मूर्ती तुझ्या मनश्चक्षूपुढे येईल अन् तू म्हणशील: ‘‘अजि म्या ब्रह्म पाहिले.’’ मला केव्हा केव्हा असे वाटते की, गीतेला सांगावयाचे आहे की ज्ञान व कर्म एकच आहेत, एवढेच नव्हे तर ज्ञान- भ्नित-कर्म देखील एकच आहेत.अंत:करणांतील दिव्य श्नतीच्या चक्षूंनी निरपेक्ष, प्रेमाच्या हातांनी व निरहंकारी प्रयत्नाच्या पायांनी विश्वरूप परमात्म्याची केलेली सेवा म्हणजेच ज्ञान-म्हणजेच कर्म-म्हणजेच भ्नती! गीतेचे तात्पर्य काय याबद्दल तुझा प्रश्न चांगला आहे.
 
गीतेचे तात्पर्य काय याबद्दल निरनिराळ्या विद्वानांमध्ये मतभेद आहेत. गीतेचे सार म्हणजे ज्ञान असे आद्य श्रीशंकराचार्यांना वाटते तर गीतेचे सार म्हणजेच कर्मयाेग असे लाेकमान्य टिळकांना वाटते. महात्मा गांधींच्या मते गीतेमध्ये सामाजिक आशय आणि ध्येयवाद आहे. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी असे सार काढले आहे की, आत्माेन्नती किंवा आत्माेद्धार हाच गीतेचा संदेश आहे. श्री राजगाेपालाचारी यांचे असे म्हणणे आहे की, निसर्गाचे नियम म्हणजे परमेश्वरी इच्छा! आपणाला त्याचे ज्ञान नाही. परमेश्वरी श्नतीला शरण जाणे एवढेच मानवाच्या हातांत आहे. याेगी अरविंद घाेष यांना असे वाटते की, निष्काम कर्म, लाेकसंग्रह, नीती इ. गाेष्टींपेक्षा शरणागती ही श्रेयस्कर आहे.
Powered By Sangraha 9.0