आपणाला लाेकांनी चांगलं म्हणावं, माेठं म्हणावं असं जवळपास प्रत्येक जीवाला वाटतं. आपली स्तुती हाेऊच नये, असे वाटणारे जीव अत्यंत कमी असतात. मुलांना आई-वडीलांनी काैतुक करावं वाटतं, स्त्रीला आपल्या स्वयंपाकाबद्दल चांगल्या प्रतिक्रियेची अपेक्षा असते.नवीन कपडे वस्तू अंगावर परीधान केल्या तर काेणीतरी त्या वस्तूच्या निमित्ताने काैतुक करावे असे परीधान कर्त्यास वाटते. एखादे थाेडेसे कार्य सिध्दीस नेले तर त्याची नाेंद काेणीतरी घ्यावी असे कार्य करणाऱ्यास वाटते. पण निश्चितच समाजात असे कांही लाेक असतात की त्यांना माेठेपणा, स्तुती, काैतुक हे शब्दही नकाे वाटतात.
असे वाटण्यासाठी निस्वार्थ प्रेम, फलेच्छारहित कर्तव्य करण्याची मानसिकता असावी लागते. तुकाराम महाराजांकडे अशीच मानसिकता हाेती म्हणून त्यांचे काैतुक करणाऱ्यांना, त्यांना माेठेपणा देणाऱ्यांना ते माझी स्तुती करू नका, मला माेठेपणा देऊ नका, माझ्यावर माेठेपणाचा हा खाेटारडा अलंकार चढवू नका, ताे मला शाेभत नाही. असे स्पष्ट सांगतांना म्हणतात, नाहीं साजत हा माेठा । मज अलंकार खाेटा ।। आपणपही स्तुतीपासून दूर राहणेच याेग्य. आपणालाही हा अलंकार खाेटा वाटला तर आनंदच आनंद असेल.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448