तणाव दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त

16 Feb 2023 15:15:58


चॅटबाॅट्स बुद्धिमान असले, तरी ते मानवी तज्ज्ञांची जागा घेऊ शकत नाहीत
 

AI
संध्यानंद.काॅम
जीवन जगण्याचा एक अटळ भाग म्हणजे तणाव. त्यांचे प्रमाण कमी करणे हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते.काही जण तणाव कमी घेतात, तर काही जण जास्त. पण, ते फार वाढल्यावर काही वेळा तज्ज्ञांची मदत घेण्याची वेळसुद्धा येते. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबाॅट्स तुम्हाला मदत करतात. स्वित्झर्लंडमधील मिसेला यांचे उदाहरण बघा.त्या आतिथ्यसेवेच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे तणाव अटळ असतात. कामाच्या जागी समाधानकारक वातावरण नसल्यामुळे मिसेला निराश हाेऊ लागल्या हाेत्या.
तणावातून बाहेर येण्यासाठी त्यांनी स्वयंमदतीच्या (सेल्फ-हेल्प) अ‍ॅपची मदत घेण्याचे ठरविले आणि त्यासाठी ‘व्यासा’ची (थूीर) निवड केली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारा हा चॅटबाॅट यूजरला चिंता, नैराश्य आणि मानसिक तणावांतून बाहेर येण्यास मदत करताे.नैराश्य आणि मानसिक तणावांतून बाहेर येण्यासाठी मिसेला यांनी पूर्वी ऑनलाइन आणि व्यक्तिश: उपचार असे दाेन पर्याय वापरले हाेते, पण त्यांचा फायदा झाला नव्हता. ‘ऑनलाइन थेरपीमध्ये वेळ खूप जाताे. पण, व्यासाची मदत लगेच मिळते आणि त्याचे परिणामसुद्धा लवकर दिसायला लागतात,’ असे मिसेला म्हणतात. प्रारंभी त्यांनी ‘व्यासा’चा उपयाेग आपले नकारात्मक विचार आणि उदास मानसिकता दूर करण्यासाठी केला.
आता मानवी तज्ज्ञाबराेबर बाेलण्याची वेळ आली आहे असे वाटल्यावर एका भारतीय तज्ज्ञाकडे त्या गेल्या आणि आता त्यांना खूप बरे वाटायला लागले आहे. ‘वापरकर्त्याच्या मनात विश्वास निर्माण व्हावा अशा पद्धतीने व्यासाच्या संभाषणाची रचना करण्यात आली आहे.समाेरासमाेर एखाद्या तज्ज्ञाबराेबर बाेलत असल्याचा अनुभव त्यातून येताे.वापरकर्त्याचा खासगीपणा यात जपला जाताे,’ अशी माहिती ‘व्यासा’च्या मुख्य मानसाेपचारतज्ज्ञ स्मृती जाेशी यांनी दिली. हा चॅटबाॅट वापरकर्त्याबाबत काहीही मत व्यक्त करत नाही. ताे तुमचे बाेलणे ऐकून घेताे. 2016मध्ये लाँच झालेले ‘व्यासा’ म्हणजे एक भारतीय स्टार्टअप असून, जगभरातील मानसिक तणावांचा विचार करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, ‘एलिझा’ हा जगातील पहिला चॅटबाॅट आहे.
उपचार आणि मैत्रीसाठी बाॅट : मानसिक तणाव दूर करण्यासाठी ऑनलाइन चॅटबाॅट्सचा वापर करण्यात आता नावीन्य उरलेले नाही. सध्या सामाजिक चॅटबाॅट्सचा (साेशल चॅटबाॅट) वापर वाढत असून, त्यांच्याबराेबर विश्वासाने बाेलता येते. तुम्हाला मानवी तज्ज्ञाबराेबर बाेलण्याची इच्छा नसेल, तर तुमच्या चिंता चॅटबाॅट्सबराेबर व्यक्त करा, असे सांगितले जाते. पण, हे चॅटबाॅट्स कृत्रिम असल्यामुळे ते तुम्हाला कसा प्रतिसाद देणार असा प्रश्न येताे. पी.डी. हिंदुजा हाॅस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमधील सायकिअ‍ॅट्री विभागाचे सल्लागार डाॅ. केरसी चावडा म्हणतात, ‘थेरपी चॅटबाॅट्स म्हणजे वेगळे काही नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीमुळे संभाषण करू शकणारे बाॅट्स असतात आणि मनाेविकार असलेल्या रुग्णांना ते मदत करतात.
त्यांच्यात विज्ञानावर आधारित माहिती भरलेली असल्यामुळे तिचा वापर ते संभाषणादरम्यान करतात. हे चॅटबाॅट्स तुम्हाला सहवास देतात, पाठिंबा देतात आणि उपचारसुद्धा सुचवितात. वेळ, अंतर आणि खर्चाचा प्रश्न असलेल्या रुग्णांसाठी असे बाॅट्स हा चांगला पर्याय ठरताे.’ याच धर्तीवर 2019मध्ये ‘स्नेहएआय’ची (Snehai.org) निर्मिती करण्यात आली. विनानफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘पाॅप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेच्या मदतीने ही निर्मिती केली गेली. शरीरातील जैविक बदलांमुळे गाेंधळलेल्या पाैगंडावस्थेतील मुली आणि मुलांसाठी ‘स्नेहएआय’ उपयुक्त ठरला आहे.
‘पीएफआय’चे प्रमुख तेजविंदरसिंग आनंद यांच्या म्हणण्यानुसार, स्नेहएआय हा चॅटबाॅट असून, त्यात कृत्रम बुद्धिमत्तेचा वापर काैशल्याने करण्यात आला आहे. समाजाचे मानसिक आराेग्य चांगले राखण्यासाठी ताे उपयुक्त ठरताे. पाैगंडावस्थेत हाेत असलेल्या शारीरिक बदलांमुळे मुली आणि मुले गाेंधळलेली असतात. या काळात त्यांनी आराेग्याची काळजी कशी घ्यावी यापासून अन्य विषयांवर यातून मार्गदर्शन केले जाते.कथा, जीआयएफ (GIF) आणि छाेट्या व्हिडिओंच्या माध्यमांतून गुंतागुंतीचा विषय साेपा करून समजावून सांगण्याचे काम हा चॅटबाॅट करताे. वापरकर्त्याचे खासगीपण जपण्याची काळजी ‘व्यासा’ आणि ‘स्नेहएआय’ घेतात. त्यांचा वापर करताना हे चॅटबाॅट्स वापरकर्त्याला तिचे अथवा त्याचे नाव, लिंग, स्थान किंवा ई- मेल पत्ता विचारत नाहीत. डपशहरळ.ेीस या संकेतस्थळावरील ‘विजेट’ (widget) यूजरला लाॅगइन न करता गेस्ट म्हणून येण्याची परवानगी देताे. ‘व्यासा’वर फक्त टाेपणनाव विचारले जाते आणि तेही फक्त ओळख पटविण्यापुरते.
कृत्रिम बुद्धिमत्ता-मानव मैत्री : चॅटबाॅट्स कितीही बुद्धिमान असले, तरी ते मानवी तज्ज्ञांची जागा घेऊ शकत नाहीत.
एखाद्या यूजरची समस्या अथवा विकार गंभीर असले, तर हे बाॅट्स त्यांना मानवी तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देतात. तसा प्राेग्राम त्यांच्यात असताे. गंभीर स्थिती असलेल्यांना मदतीसाठी ‘स्नेहएआय’ आणि ‘व्यासा’ हे बाॅट्स हेल्पलाइन नंबर्स देतात. स्मृती जाेशी म्हणतात, ‘मानवी तज्ज्ञांची जागा घेण्यास एआय चॅटबाॅट्स आलेले नाहीत. मानसिक आराेग्याबाबत माहिती देण्यासाठी आणि तुमच्या समस्या ऐकण्यासाठी ते चांगले आहेत.’ आपले म्हणणे ऐकून घेणारे काेणी असल्याचे समाधान यांच्यामुळे मिळत असल्याचे मत ओस्लाे विद्यापीठातील प्राध्यापक पीटर बाए ब्रँडझॅग यांनी व्यक्त केले आहे. चॅटबाॅट्समुळे सामाजिक आधार लाभल्याचे समाधान मिळते. त्यांच्याबराेबरचा संवाद सुरक्षित असणे हेही एक कारण असल्याचे ते नमूद करतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्यात अशी मैत्री हाेऊ शकत असल्याचे त्यांना वाटते. पण, एआय प्लॅटफाॅर्मवरील संभाषण हॅक हाेण्याचा धाेकासुद्धा असताे असे ते म्हणतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0