भाव ज्याचे गांठीं । त्यासी लाभ उठाउठी ।।2।।

15 Feb 2023 16:12:46
 
 

saint 
संत, महात्मे, हृदयातून, मनातून भावाची जाेपासणूक करतात. म्हणून ते सर्वांसाठी पूजनीय ठरतात. संसारात अडकलेला जीव बऱ्याच वेळा व्यवहार म्हणून किंवा समाेरच्यांना बरे वाटावे म्हणून खाेटारडा भाव प्रकट करताे. हा भाव त्यालाही आंनद देत नाही व समाेरच्यालाही खरा आनंद देत नाही. ज्याच्या हृदयात खराेखर भाव आहे, त्याला भाव प्रकट कर असे म्हणावे लागत नाही. ताे प्रसंगानुरूप आपाेआप प्रकट हाेत असताे. मला आठवते मी एका महिला अधिकाऱ्यासाेबत एका अनाथ आश्रमात गेलाे हाेताे.तिथे एका अपंग मुलीला पाहताच त्यांनी त्याला पटकन उचलून घेतले. कितनी प्यारी बच्ची है, म्हणत त्यांनी तिचा मुका घेतला व तिच्या डाेक्यापाठीवरून हात फिरवला.सर्व उपस्थितांना या दृश्याने एक अद्भुत आनंद दिला. असे अनेक लाेक समाजात आहेत की काेणतेही कार्य अत्यंत भाविकतेने करतात.
 
बाबा आमटेंचा आश्रम आठवला म्हणजे प्रत्येकाचे हृदय भरून येते. एका हृदयाने अनेक हृदयांना जागृत करणे म्हणजे समाजासाठीचा हा फार माेठा लाभ आहे. आपणाला सर्व समाजाला लाभ देता आला नाही तरी, किमान आपल्या कुटूंबाला तरी आपण भावात्मक लाभ देऊ शकलाे पाहिजे. बरेच लाेक कुटुंबातील सदस्यांनाही चांगल्या भावाचा लाभ देत नाहीत. आपण मात्र चांगला भाव जाेपासू या. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0