आपल्या प्रमुख विभूती सांगून झाल्यावर भगवंत विभूती म्हणजे नेमके काय याचा स्पष्ट उलगडा करीत आहेत. जी जी वस्तू ऐश्वर्याने, संपत्तीने, दयेने युक्त असेल, ती ती माझ्याच तेजाच्या अंशापासून निर्माण झाली आहे. खरे म्हणजे माझ्या विभूतींना अंत नाही, पण तू विचारलेस म्हणून मी सुमारे पंचाहत्तर विभूती तुला सांगितल्या. पण, यानंतर मला हे सांगणे व्यर्थ वाटले. आम्ही आमच्या विभूती सांगणार तरी किती? आणि तू ऐकणार किती? म्हणून आम्ही सारांशाने सांगताे की, सर्व प्राण्यांच्या रूपाने अंकुरणारे जे बीज आहे ते मीच आहे. लहान, माेठी अशी निवड करू नये. कमीजास्त याेग्यता मानू नये. जेवढ्या वस्तू आहेत, तेवढ्या एकच आहेत असे मानावे. अर्जुना, हे सर्व ज्ञान तुला सांगून काय उपयाेग?
सर्व विभूती तू काेठवर जाणणार? थाेडक्यात लक्षात ठेव की, माझ्याच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे. सूर्यबिंब आकाशात एकटेच असते. पण त्याचा प्रकाश त्रैलाेक्यात पसरताे. त्याप्रमाणे माझी एकाची आज्ञा सर्व मानतात. हे सर्व लाेक एकटे आहेत असे मानू नकाेस. त्यांना ऐश्वर्यशून्य समजू नकाेस. कामधेनूबराेबर सर्व संपत्ती असतेच ना? जे आपण मागू ते ती प्रसवते. त्याप्रमाणे सर्व ऐश्वर्ये माझ्या भक्ताबराेबर असतात. अर्जुना, असे लाेक म्हणजे माझे अवतारच समज.या विश्वात एक साधारण व एक चांगला असा भेद कसा करावा? माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक नसताे.तूप कशाला घुसळावे? अमृत कशाला शिजवावे? त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सामान्य व विशेष असा भेद नाही.