कलासंगमातून उलगडले ‌‘अटल' जीवनपैलू

    27-Dec-2023
Total Views |
 
atal
 
पुणे, 26 डिसेंबर (आ.प्र.)) :
 
शिल्पकला, चित्रकला, रंगावली, फोटोग्राफी, कॅलीग्राफी अशा विविध कलांचा संगम असणारे ‌‘कलासंगम'मधून दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना जन्मशताब्दीनिमित्त अनोखे अभिवादन करण्यात आले. विविध कलांच्या माध्यमातून साकारलेले अटलजी त्यांच्या विविधांगी जीवनाची साक्ष देणारे होते. त्यातच अवघ्या पाच मिनिटांत ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी रेखाटलेले अटलजी सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन गेले. निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‌‘अटलपर्व' या अभिवादन ‌‘कलासंगम'चे. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते या अटलपर्व कलासंगमचे उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, आयोजक आणि संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार गिरिश चरवड, सुलेखनकार मनोहर देसाई, विनायक रासकर, गणेश केंजळे यांच्यासह कलावंत उपस्थित होते.उद्घाटनानंतर शिल्पकार कांबळे म्हणाले, ‌‘कलाकारांना ‌‘अटलपर्व'च्या निमित्ताने व्यासपीठ निर्माण करून दिले, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार. अटलपर्व हा अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम असून, येथे कलाविष्कार सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना विशेषतः चित्रकार आणि शिल्पकारांना शुभेच्छा. आयोजकांनी एक सुंदर संधी दिल्यामुळे रांगोळी, शिल्प, पोर्ट्रेट, चित्रे अशा विविध कला एकत्र सादर करण्याचा, पाहण्याचा आणि अनुभव घेण्याचा हा दुर्र्मीळ योग आला आहे.'
 
आयोजक मोहोळ म्हणाले, ‌‘कलाकार मंडळी एकत्र जमून त्यांनी कला सादर केली, हेच अटलजींना अनोखे अभिवादन ठरले असून, त्याचा खूप आनंद आहे. अटलजींचे स्वप्न असलेले श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत साकारत आहे आणि त्यासाठी हातभार लागलेले मोठे कलाकार म्हणजे प्रमोदजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, हा योग जुळून आला आहे. त्यांच्यामुळेच नवीन कलाकारांना मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. या ठिकाणी जमलेले प्रतिभावंत, प्रभावशाली कलावंत पाहून सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणे ही मोठी गोष्ट नाही. पण, आपली सर्वोत्तम कला सादर करता यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. अटलजींना अभिप्रेत असलेली संकल्पना या कलेतून साकार होत आहे. या सांस्कृतिक वारशाचे पाईक आपण आहात, त्याचप्रमाणे रक्षकही आपणच आहात. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत साकारले जात असताना त्यासाठी प्रमोदजी काम करतात याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. अशा मोठ्या कलाकाराची प्रेरणा घेऊन रांगोळी, शिल्प, पोर्ट्रेट, चित्रकला यासाठी मोठमोठे शिल्पकार आणि चित्रकार आलेत, हे खरोखर उल्लेखनीय म्हणावे लागेल'