परमात्मा आपलासा करून घ्यायला, आमची शक्ती किती असणार? आमचा जीव केवढा! आमच्यात बाकीच्या गाेष्टी किती! आम्ही किती धडपड करू? भगवंताला शरणागती हा एकच मार्ग खरा. आपल्यासारख्याला तपश्चर्या किती करता येणार? ‘भगवंता, आता तुझ्यावाचून माझे काेणी नाही’ असे त्याला मनापासून सांगा, परमात्मा खचित उभा राहील. ज्यावेळी गजेन्द्राने कळवळून हाक मारली तेव्हा भगवंत उभा राहिला द्राैपदीची गाेष्ट तुम्हाला माहीत आहेच. या पुराणातल्या गाेष्टी तुम्ही खाेट्या मानू नका. आपली तशी तयारी नाही म्हणून आपल्याला असे वाटते.हाच अनुभव आपल्याला आल्याशिवाय रहाणार नाही.ही भावना निर्माण करण्याकरता नीतीचे महत्त्व कशात असेल तर विषयाची आसक्ती कमी करण्यात आहे.
आसक्तीमुळे आम्ही विषयाचे गुलाम बनलाे. त्याचे मालक बनणे अगदी जरूरीचे आहे.जाेपर्यंत मी विकारांचा मालक नाही ताेपर्यंत मला भगवंताचे दास्यत्व करता येणार नाही. मी भगवंताचा दास व्हायला, माझा मी स्वतंत्र असला पाहिजे ना? शरणागतीसारखा उपाय नाही, आणि शरणागती व्हायला नामासारखे साधन नाही खास. मला भगवंत हवा असे वाटू द्या; आणि अशी भूक लागणे यासाठीच धडपड आहे खरी. ती भूक लागण्याकरता जर औषध काेणते असेल तर ते भगवंताचे स्मरण हाेय.स्मरणाने प्रेम लागते हे आपण पहाताे ना? जन्मापासून मला देहाची संगत लागली आहे. भगवंताची संगत लागण्याकरता उत्तम मार्ग असेल तर भगवंताचे स्मरण.
त्याने ती भूक निर्माण झाल्यावर वाढत जाईल, आणि त्यातच भगवंताची प्राप्ती आहे. समाधान हे त्याचे फळ आहे. काेणतीही परिस्थिती असू द्या, मनुष्य म्हणून जाे जन्माला आला ताे भगवंताच्या प्राप्तीला याेग्य म्हणून ठरला.जरूरी तळमळीची आहे. दाेन गाेष्टी करा; भगवंत भगवंताकरताच पाहिजे आहे ही भावना ठेवा; आणि त्याची प्राप्ती हाेण्याकरता भगवंताचे गाेड नाम तुम्ही घ्या. नामासारखे कल्याणाचे काेणते नाही, बरे का! आपल्याकडे सत्पुरुष हाेऊन गेले, नामाचे माहात्म्य त्यांनी इतके सांगितले की, रामाचे वर्णन करता येईल पण त्याच्या नामाचे वर्णन नाही करता येणार.रामाला मारुतिरायाने सांगितले, ‘तुझ्या नामाचा महिमा तुलाही माहिती नाहीं.’ नामाचा महिमा अनुभव घेऊनच सांगणे हे जरूर आहे. ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म जंतूंची वाढ अगदी झपाट्याने हाेते, त्याचप्रमाणे वासना अति सूक्ष्म असून तिची वाढ ार लवकर हाेते. ती नाहीशी करायला एक नामच तेवढे समर्थ आहे.