डॉ. नीरज आडकर
चीफ रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन
आणि स्पोर्ट्स इंज्युरी स्पेशालिस्ट
*********************************
डीपी रोड, औंध, पुणे 411007
फोन : 020-67448600/25888600
मोबा : 9689930608/12
web : www.saishreehospital.org
सांध्यांचे विकार होण्यामागे अनेक कारणे असतात. वाढत्या वयानुसार कॅल्शियमची कमतरता हे त्यातील एक कारण. कॅल्शियम पुरेसे नसल्याने हाडे ठिसूळ होतात. मात्र, वेळेत या विकारांचे निदान झाले आणि त्यावर योग्य उपचार घेतले, तर दैनंदिन व्यवहारांत अडचणी येत नाहीत. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटलचे संचालक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांनी सविस्तर उत्तरे देऊन शंका दूर केल्या आहेत.
डॉक्टर, मी तुमचा हा स्तंभ नियमितपणे वाचतो आणि माझा प्रश्न ‘अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट'बाबत (Anterior cruciate ligament-ACL) आहे. दुखापत झालेल्या (torn) ‘एसीएल'ची मुख्य लक्षणे कोणती?
उत्तर : वेदना हे कोणत्याही दुखापतीचे लगेच जाणवणारे लक्षण असते. काहींना गुडघ्यांत सूज येणे (knee swelling), चालताना किंवा कामे करताना अस्थैर्य जाणवणे (buckled knee sensation) किंवा जिने चढताना कष्ट होणे असे त्रासही होतात. ही सगळी ‘एसीएल'ला झालेल्या दुखापतीची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त दुखापत झालेल्या ‘एसीएल'मुळे गुडघ्यांमध्ये अस्थैर्य आले असेल, तर त्यातून ‘मेनिस्कस'च्या (meniscus) इजा होण्याची शक्यता निर्माण होऊन गुंतागुंत आणखी वाढते.
सर, माझी हाडे कमकुवत होत असल्याची स्पष्ट लक्षणे कोणती?
उत्तर : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे दुर्बल किंवा ठिसूळ (brittle) होऊ लागण्याच्या स्थितीला ‘ऑस्टिओपोरोसिस' (osteoporosis) म्हणतात. हा वयाबरोबर संबंधित विकार आहे. माणूस जसा वृद्ध होत जातो तसे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. पाठीत वेदना होणे, दैनंदिन कामे करताना थकवा जाणवणे आणि हाता-पायांत पेटके येणे (cramping) ही ‘ऑस्टिओपोरोसिस'ची सर्वसामान्य लक्षणे असतात. या विकाराची विशिष्ट अशी कोणती लक्षणे नसून, ती हळूहळू वाढायला लागत असल्यामुळे ‘ऑस्टिओपोरोसिस'चा उल्लेख silent disease असा केला जातो. पण, ही लक्षणे जाणवण्यासारखी असतील आणि ती कोणत्या स्थितीत आहेत याचे निदान वेळेत झाले, तर त्यावर काही उपचार करणे शक्य असते.
‘ऑस्टिओपोरोसिस' बरा होऊ शकतो का?
उत्तर : हा विकार कोणत्या टप्प्यावर आहे याचे निदान झाले, तर ‘ऑस्टिओपोरोसिस'वर उपचार करता येतात. या विकाराची स्थिती पाहून कोणते उपचार करावयाचे हे निश्चित केले जाते. हा विकार प्राथमिक अवस्थेत (initial stage) असताना डी जीवनसत्त्व आणि कॅल्शियमच्या गोळ्या देऊन इलाज करता येतो. नासल स्प्रेज (nasal sprays) आणि अन्य सप्लिमेंट्सही देता येतात. त्यापुढील अवस्थेत इंजेक्शन्सही दिली जातात. म्हणजे, या विकाराच्या विविध टप्प्यांत वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरल्या जाऊन हा विकार रोखता येऊ शकतो.
एखाद्याला ‘ऑस्टिओपोरोसिस'चे निदान झाल्यावर त्याने काय करावे?
उत्तर : तुम्हाला ‘ऑस्टिओपोरोसिस' झाल्याचे निदान झाले असेल, तर तुम्ही काळजी घेतली पाहिजेत. त्यासाठी औषधे, सप्लिमेंट्स आणि नासल स्प्रेजबरोबरच चांगला आणि आरोग्यदायी आहारसुद्धा तुम्ही घेतला पाहिजे. कारण, फक्त औषधे परिणामकारक नसतात. या विकाराच्या रुग्णांनी दररोज नियमितपणे सूर्यप्रकाशात राहावयास हवे आणि काही तरी व्यायामही करावयास हवा. हा विकार रोखण्यासाठी स्नायू बळकट करणारे व्यायाम (Strength training of the muscles) चांगले ठरतात. त्यामुळे, या विकाराच्या रुग्णाला औषधे घेण्याबरोबरच जीवनशैलीत बदल करणेसुद्धा आवश्यक असते आणि त्याला योग्य आहार आणि व्यायामाची जोड द्यावयास हवी.
‘ऑस्टिओआर्थ्रायटिस' (Osteoarthritis) म्हणजे काय?
उत्तर : वयोमानानुसार सांध्यांची झीज होणे ( wear & tear) म्हणजे ‘ऑस्टिओआर्थ्रायटिस.' आपल्या पायांमध्ये गुडघ्यांच्या हाडाच्या वर एक थर असतो. त्याला कूर्चा (cartilage) म्हणतात. वयानुसार कूर्चेची झीज झाल्यामुळे हाडे एकमेकांना घासली जाऊ लागतात आणि त्यामुळे सांध्यांमध्ये घर्षण (friction) होऊन वेदना होऊ लागतात. थोडक्यात, कूर्चेची झीज होणे म्हणजे ‘ऑस्टिओआर्थ्रायटिस.' तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार ‘ओए उपचार' (OA treatment) सांगितले जातात.