समाजाच्या भल्यासाठी काही करावेसे वाटणे आणि प्रत्यक्ष काही करणे यात अंतर असते. काही जण फक्त विचार करतात, तर काही बाेलतात. प्रत्यक्ष कृती करणारे फार थाेडे.चंडीगडमधील निवृत्त प्राध्यापिका अनुराधा शर्मा यांचा प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांत समावेश हाेताे. शहरातील से्नटर-11मधील ‘पाेस्ट ग्रॅज्युएट गव्हर्न्मेंट काॅलेज’मधून (जीसीएम) निवृत्त झाल्यापासून गेली वीस वर्षे त्या गरजू मुलींना आपल्या घरी माेफत शिकवित आहेत. त्यासाठी त्यांनी घराचे रूपांतर शाळेत केले आहे. घरेलू कामगार महिला आणि मजुरांच्या मुलींना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात वावरण्यासाठी सक्षम करण्याचे काम त्या करीत आहेत. या काळात शेकडाे मुली त्यांच्याकडे शिकल्या आणि आजही हा कार्यक्रम सुरू आहे.
शासकीय महाविद्यालयात कार्यरत असताना प्रा. अनुराधा शर्मा सरकारी निवासस्थानात राहत असत. त्यांच्या घराजवळ असलेल्या कामगार महिलांच्या मुलींसाठी शिक्षणाची काही साेय नसल्याचे त्यांना दिसले हाेते. निवृत्त झाल्यावर त्यांनी या मुलींना शिकविणे सुरू केले आणि आजही त्या दरराेज तीन ते चार तास वर्ग घेतात.पाच हजार मुली शिकल्या प्रा. अनुराधा शर्मा यांनी 2003पासून गरीब-गरजू मुलींना शिक्षण देणे सुरू केले आणि त्यासाठी ‘हमारी कक्षा’ ही बिगर सरकारी संस्था (एनजीओ) सुरू केली. शासकीय प्राथमिक शाळांचे संचालक एस. के. सेतिया यांनी शाळा सुटल्यावर गरीब मुलांना शिकविण्याची परवानगी प्रा. शर्मा यांनी दिली.दरवर्षी सुमारे पाचशे मुली त्यांच्याकडे शिक्षण घेतात. आतापर्यंत पाच हजार मुली त्यांच्याकडून शिक्षण घेऊन पुढे प्रगती करत आहेत. या मुलींना शिक्षण देण्याबराेबरच त्यांच्या वह्या-पुस्तकांचा खर्चही प्रा. अनुराधा शर्मा स्वत: करतात.
त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे ‘हमारी कक्षा’मध्ये शिकलेली बहुतेक मुले-मुली नाेकरदार झाली किंवा त्यांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. आपल्या प्रयत्नांमुळे गरीब मुली स्वावलंबी हाेऊ शकल्याचे समाधान प्रा. शर्मा यांना आहे.शिक्षणाअभावी माेकळी फिरणारी ही मुले आता नाेकरीव्यवसाय करत असल्याचे पाहून त्यांना आनंद हाेताे.संघर्षमय जीवन प्रा. अनुराधा शर्मा यांचे आयुष्य संघर्षमय आहे. त्यांच्या पतीचे लवकर निधन झाल्याचा धक्का त्यांना सहन करावा लागला आणि नंतर काही वर्षांनी त्यांना स्वत:ला कर्कराेगाबराेबर झुंजावे लागले. मात्र, तरीही त्यांनी गरीब मुलींना शिकविण्याचे काम चालूच ठेवले हे विशेष. त्यांच्या या कार्याची दखल सरकारसह अनेक संस्थांनी घेतली असून, विविध सन्मान त्यांना देण्यात आले आहेत.काेराेना महामारीच्या काळातसुद्धा प्रा. अनुराधा शर्मा यांनी ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकविले.
त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. या कामात त्यांना त्यांच्या वहिनी सरिता तिवारी तसेच रितू, प्रगती आणि अनू गुप्ता या शिक्षिकांची सदैव मदत हाेत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. ‘हमारी कक्षा’ची माहिती मिळायला लागल्यावर निवृत्त शिक्षक, नागरी सेवेतील अधिकारी तसेच बँकिंग क्षेत्रांतील लाेक या गरजू मुलींना अभ्यासासाठी आवश्यक सामग्री आपणहून देऊ लागले आहेत.इयत्ता 11वी, 12वीतील विद्यार्थी तसेच बी.एड.करणारी मुलेही ‘हमारी कक्षा’मध्ये येऊन मुलींना शिकविण्याचे काम करत आहेत. ‘गरीब मुलींना शिक्षण देण्याचे काम सुरू करून प्रा. अनुराधा शर्मा यांनी, त्या एक जबाबदार शिक्षिका असल्याचा प्रत्यय दिला आहे,’ असे मत एस. के.सेतिया यांनी व्यक्त केले.