सीईओपी टेक्निकल विद्यापीठाचा जागतिक दर्जा उंचावणार : डॉ. प्रमोद चौधरी

    11-Oct-2023
Total Views |
 
CEO
 
पुणे, 10 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुण्यातील सर्वांत 170 वर्षांची परंपरा असलेल्या सीईओपी टेक्निकल विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्षमता वाढवून विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी दिली. विद्यापीठाने भविष्यतील विविध शैक्षणिक व अन्य विकासात्मक हाती घेतली जाणारी कामे याबाबत डॉ. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सीईओपी टेक्निकल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, केपीएमजी या जागतिक व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे भागीदार नारायणन रामास्वामी उपस्थित होते. भविष्यतील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध हव्यात यासाठी विद्यापीठाने जागतिक केपीएमजी या संस्थेशी करार केला आहे.
 
या भागीदारीचा विद्यापीठाला निश्चित फायदा होईल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले. केपीएमजीने विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी आणि प्राध्यापक सदस्य यांचेबरोबर कामास प्रारंभही केला आहे. विद्यापीठाने निश्चित केलेले टार्गेट गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी, जमेच्या बाजू, संभाव्य अडचणी यांचा अभ्यास केला जात आहे. यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करून उपाययोजना केल्या जातील व हे काम वर्षभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली. नवनवीन क्षेत्रे विकसित करताना कामामध्ये सुसूत्रीकरण आणून विविध समित्या व सल्लागार समित्यांचे पुरर्गठन केले आहे, असे प्रा. सुधीर आगाशे यांनी सांगितले. चिखली येथे जागतिक दर्जाचे नवीन रिसर्च व इनोव्हेशन पार्क विकसित केले जात आहे. विद्यापीठात प्राध्यापकांच्या सर्व जागा भरण्यासाठी प्रयत्न असल्याचेही कुलगुरूंंनी सांगितले.