सर्व अनुभवांत आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वत:ला येईल ताे अनुभव हाच खरामहत्त्वाचा.आत्मप्रचितीने जागरूकता येईल.भाव वाढेल, साधनाला जाेर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर हाेईल. संतांनी पुष्कळ गाेष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला, तसा आपल्याला वाटताे का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की, आपण लहानाचे माेठे झालाे, विद्या संपादन केली, नाेकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे! हे आपले ‘हवे’ पण केव्हा संपणार?
आपण नाेकरी करताे, काेणी वकिली, काेणी डाॅक्टरकी. नाेकरी करणारा, मालकाला आपल्याशिवाय दुसरा काेणी नाेकर मिळणार नाही म्हणून काही नाेकरी करीत नाही, किंवा अशिलाला काेणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही. म्हणजेच नाेकरीवाला काय, डाॅक्टर काय, वकील काय, काेणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने ताे करीत असताे. परंतु आपण पाहताेच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते. त्याला पूर्णता येत नाही.एखादी गाेष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही, असे काही वाटत नाही.
आता काहीएक नकाे आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे हाेईल, हे सर्व टिकेल का, यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच! एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर, समजा पाच वर्षे मूल झाले नाही, तरी हा काळजी करताेच; आणि समजा, मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच! तेव्हा या प्रपंचाच्या गाेष्टी अपूर्ण आहेत. त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? या गाेष्टी एकांतून एक निर्माण हाेणाऱ्या आहेत.
ज्या ज्या म्हणून सुखाच्या गाेष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण हाेणार नाही.ज्या गाेष्टी अपूर्णच आहेत, त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? समजा, एका वेड्याच्या इस्पितळात दाेनशे वेडे आहेत. जर कुणी म्हणाले की, आता आणखी शंभर वेडे आले की, एक शहाणा त्यातून निर्माण हाेईल, तर कधी शक्य आहे का हे?