सहजपूजा याचि नांवें । गळित अभिमानें व्हावें ।।1।।

04 Jan 2023 14:35:09
 
 

Saint 
 
अहंकार, मीपणा अर्थात, देहाभिमान साेडून केलेले कार्य म्हणजे एक प्रकारची पूजाच हाेय. पूजा म्हणजे केवळ मूर्तीसमाेर बसून नामस्मरण करणे, मूर्तीला स्नान घालून हळद, कुंकू, पुष्प वाहने नव्हे. खरी पूजा ही कर्तव्यातूनच हाेत असते. रात्रंदिन नामस्मरण करणारा, तीर्थ यात्रा करणारा, उपवास, व्रत, वैकल्ये करणारा असेल आणि मी हे करताे, ते करताे असे म्हणत असेल तर त्याची ही सर्व पूजा व्यर्थ जाते.परमेश्वराच्या पूजेसाठी ताट, आरती, पुष्प, नारळ आदिपेक्षा कर्तव्याचीच जास्त गरज असते. आपल्या वाट्याला आलेले कार्य नीतीनियमपूर्वक व सकारात्मक वृत्तीने सहजपणे करणे. तसेच या केलेल्या कार्याचा कसलाही अभिमान न बाळगणे म्हणजे ईश्वराची खरी पूजा हाेय.
 
हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, सहजपूजा याचि नांवें । गळित अभिमानें व्हावें ।। अभिमानामुळे तात्पुरता आनंद मिळत असला तरी हा आनंद कालांतराने का हाेईना पण व्यर्थ अभिमान क्लेशकारक ठरताे, ताे दु:ख देताे. त्याचबराेबर अभिमानाचा सांभाळ करण्यासाठी माणसाला बऱ्याचवेळा नकाे ते करावे लागते. विशेष म्हणजे माणूस नकाे ते करताेही.म्हणून आपण काळजी घेऊन वागणे आवश्यक असते.आपला स्वभावच अनेक समस्यांना कारणीभूत असताे.
जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0