मराठी भाषेच्या साैंदर्याने व अर्थगांभीर्याने ज्ञानेश्वरही माेहित झालेले दिसतात. या मराठीत नवरसांना तारुण्य येते आणि अमर्याद असे गीतातत्त्व आकाराला येते. हे गीतातत्त्व सांगताना श्रीकृष्ण काय म्हणाले हे मी आता निराेपित करताे. ज्ञानदेवांचे हे बाेलणे ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, आम्ही तुझे सर्व निरूपण नीट ऐकले आहे. ते चांगलेच आहे. आता पुढे श्रीकृष्ण काय म्हणाले याचे स्पष्टीकरण कर. घागरीत थाेडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी घालावे, त्याप्रमाणे तुझे बाेलणे पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. अर्जुना, तू लक्षपूर्वक ऐकत असल्याकारणाने आमच्या राहण्याचे स्थानच तू बनला आहेस असे माेठ्या प्रेमाने श्रीकृष्ण अर्जुनाला बाेलू लागले.डाेंगरावर ज्याप्रमाणे मेघांची दाटी हाेते, त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, आम्ही जे सांगितले तेच पुन्हा सांगणार आहाेत.
शेताची पेरणी आणि मशागत प्रत्येक वर्षी करावी लागते. साेन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली की त्याचा कस वाढून साेने अधिकच शुद्ध हाेते.अर्जुना, त्याप्रमाणे येथे आहे. तुला उपदेश करण्यामुळे तुझ्यावर उपकाराचे ओझे आले आहे असे मुळीच समजू नकाेस. कारण आम्ही आपल्या स्वत:च्या सुखासाठीच हे तत्त्व प्रकट करीत आहाेत. अरे, मुलांना आपण दागिने घालताे, पण त्या दागिन्यांची किंमत मुलांना वाटते का? त्यांच्या शाेभेचा आनंद आईने भाेगावयाचा असताे. त्याचप्रमाणे तुला गीतातत्त्व जसे समजेल तसा आमचा आनंद दुप्पट हाेताे. तुझ्यावरील प्रेमच असे आहे की, तुझ्याशी बाेलताना तृप्ती हाेत नाही. म्हणूनच पुन्हापुन्हा तेच ते बाेलावे लागते.