प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे

24 Jan 2023 14:06:12
 
 

Gondavlekar 
 
प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते, भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे, असे वाटते.
तरीही हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाहताना, कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावे? आपण सर्वजण सदाचाराने वागताे असे आपल्याला वाटते, भगवंताचे भजनपूजन आपण सर्वजण करताे, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरे कारण काेणते असेल, तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचांत पैसा-अडका असावा, बायकामुले असावीत, शेतीवाडी, नाेकरीधंदा, इतर वैभव असावे, आणि त्याचबराेबर भगवंतही असावा, असे आपल्याला वाटते.
 
प्रपंचाची स्थिती कशीही असाे, मला भगवंत हवाच, असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज, प्रपंचात आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर, एका डाेंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटाेपात समाधान किती मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करताे, पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की, प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही ताे आम्हाला सुख देत नाही, हे अनुभवाला येऊनसुद्धा ताे टाकावा, असे आम्हाला वाटत नाही.प्रपंचात आम्हाला सुख मिळेल, ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे.
 
प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही, हे एकदा निश्चयाने ठरले, आणि हा निश्चय एकदा दृढ झाला, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग, परिस्थिती वगैरे काहीही येऊ शकणार नाही.भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरविल्यावर, त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे.हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे; दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जाेपासना करणे; आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जाे जुळेल ताे त्याने करावा.
Powered By Sangraha 9.0