नमाे संसारतमसूर्या। अपरिमिता परमवीर्या। तरुणतरतुर्या। लालनलीला ।। 10.2

24 Jan 2023 14:10:25
 
 

Dyaneshwari 
प्रत्येक अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी श्रद्धा व काव्य यांचा मेळ बसेल अशी उत्तम नमने वा मंगलाचरणे लिहिलेली आहेत.प्रत्येक अध्यायाचे नमन चिंतन करण्यासारखे आहे. संस्कृत शास्त्राप्रमाणे नमनाचे तीन प्रकार हाेतात. एक आशिरूप नमन. या नमनात इष्ट देवतेचे स्तवन असते. श्राेत्यांचे कल्याण चिंतिलेले असते. दुसऱ्या प्रकारच्या नमनास नमस्क्रियारूप असे नाव आहे. यातही आपल्या देवतेचे स्मरण व वंदन असते. तिसऱ्या प्रकारच्या नमनास वस्तुनिर्देशरूप असे नाव असून यात वरील दाेन्हीपैकी काेणताही विषय नसून ग्रंथातील मुख्य विषय सूचित केलेला असताे. ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वत:चे सद्गुरू, श्राेत्यांविषयी प्रेम, गुरुकृपेचे सामर्थ्य, गीतामहाभारताची याेग्यता, मराठी भाषेचे महत्त्व, अध्यायांची संगती, इत्यादि विषय नमनांतून घेतले आहेत.
 
वरील नमनात ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरुनाथांचे मनापासून वर्णन करताना दिसतात. अध्यायाच्या प्रारंभीच ॐकाराचा जयजयकार करून ज्ञानेश्वर निवृत्तिनाथांचा नम्रतेने वंदन करतात. ते म्हणतात, गुरुराया, तू परमार्थबाेध स्पष्ट करण्यात चतुर आहेत.तू विद्यारूपी कमलाचा विकास करताेस. आणि पराप्रकृती हीच काेणी एक सुंदर स्त्री असून तू तिच्याशी सुखाने क्रीडा करीत आहेस, अशा तुला माझे नमन असाे. अज्ञानरूपी अंधाराला नष्ट करणारा तू सूर्य आहेस. तुझे सामर्थ्य माेठे आहे. नुकतीच वयात आलेली तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधी हिचे तू सहज लालन करीत असताेस. तू कल्याणरूपी रत्नांचा संग्रह आहेस. सर्वांना सुगंधित करणारा चंदन तूच आहेस.
Powered By Sangraha 9.0