आपण कसे आहाेत हे स्पष्ट करताना भगवंत म्हणतात की, आपण सर्व भूतांच्या ठिकाणी सारखेच आहाेत. विषम भावना, आपपर भाव आपल्यात नाही. पत्र, पुष्प, फल यांनी मी संतुष्ट हाेताे असे मागच्या ओवीत सांगितले असले तरी या वस्तू म्हणजे प्रेमाचे केवळ निमित्त आहे. त्यामागील भाव फक्त मी पाहताे. नि:सीम भक्ती, प्रेम हेच माझ्या प्राप्तीचे खरे साधन आहे. म्हणून अर्जुना, तू ऐक. तुला माझी प्राप्ती सुलभ व्हायची असेल तर चुकूनही मला विसरू नकाेस.अर्जुना, तू जे जे काही करशील अथवा जे जे भाेग भाेगशील, यज्ञ करशील, दान देशील, तपादि साधने करशील, या सर्व क्रिया माझे ध्यान ठेवून तू करीत जा आणि हे करताना मी अमुक केले अशी कर्तृत्त्वाची आठवण यत्किंचितही ठेवू नकाेस.
सर्व काही धुतल्याप्रमाणे मला अर्पण कर. अग्निकुंडात घातलेले बी जसे अंकुरित हाेत नाही. त्याचप्रमाणे मला अर्पण केलेले कर्म सुख दुःखरूपी फळ देत नाही. कर्माच्या अर्पणाबराेबर जन्ममरण पुसले जाते आणि त्यामुळे दु:खही नाहीसे हाेते. कर्मकर्तृत्व आणि अकर्तृत्व असण्याची ही साेपी युक्ती तुला मी सांगितली नाही. या युक्तीने देहाच्या बंदिवासात पडावे लागत नाही.सुखदु:खांच्या समुद्रात बुडावे लागत नाही. सुखरूप हाेऊन माझ्यातच मिळून गेल्यावर मग कसलीच चिंता उरणार नाही. असे माझे स्वरूप तू अहंकार साेडून व सर्व कर्मे मला अर्पण करून माझी भक्ती कर म्हणजे मी तुझाच आहे हे ध्यानात येईल.