काळजी प्रपंचाची न करता परमेश्वरप्राप्तीची करावी

12 Jan 2023 16:19:48
 
 

Gondavelakr 
 
आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही. त्याप्रमाणे समाधानाकरिता, आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी हाेईल याची काळजी करा. भगवंतावर संपूर्ण निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर हाेणार नाही.सर्व जगताचा जाे पालनकर्ता, ताे आपले पालन नाही का करणार ? प्रत्येक गाेष्ट त्याच्याच सत्तेने हाेते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक हाेणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा.आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खाेटी कशी हाेऊ शकेल ? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्राैपदीची निष्ठा मात्र जबरदस्त हाेती. ती म्हणाली, ‘आपण श्रीकृष्णाला विचारू.’ तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला.श्रीकृष्ण म्हणाला,‘भीष्माची प्रतिज्ञा खाेटी कशी हाेईल? तरी आपण एक प्रयत्न करून बघू.’ ताे म्हणाला,‘द्राैपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा.
 
तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबराेबर आश्रमापर्यंत येताे’ त्यानंतर श्रीकृष्ण द्राैपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले.श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की, ‘भीष्माचार्य आता झाेपत आहेत. अशा वेळी तू आत जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर.’ त्याप्रमाणे द्राैपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना तिने नमस्कार केला. त्यांनी लगेच तिला ‘अखंड साैभाग्यवती भव’ म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले ताे द्राैपद्री! तेव्हा ते म्हणाले, ‘द्राैपदी, ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबराेबर काेण आहे ते सांग.’ ती म्हणाली,‘मी माझ्याबराेबर गडी आणला आहे; ताे बाहेर उभा आहे’ भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम हाेऊन चुकले हाेते. म्हणून म्हणताे, परमात्म्यावर एक पूर्ण निष्ठा पाहिजे.या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर ताे म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे; ताे घालविण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही.
Powered By Sangraha 9.0