स्मरण देवाचे करावे। अखंड नाम जपत जावे ।।2।।

11 Jan 2023 14:57:11
 
 

Saint 
श्रीसमर्थ म्हणतात, परमेश्वराचे नामस्मरण सतत केल्याने निश्चितपणे खरे समाधान प्राप्त हाेते. नामस्मरणात वेळेचे व स्थळाचे, काळाचे व परिस्थितीचे काेणतेही बंधन नाही. त्यामुळे ते सकाळी, दुपारी, सायंकाळी अशा काेणत्याही वेळी केले तरी फलदायी हाेतेच. सुखप्रसंगी, दु:खाचे वेळी, चिंता असताना अथवा आनंदसमयी अशा सर्व प्रसंगात नामाची साथ कधीही साेडू नये. हर्षकाळी, विषम म्हणजे विराेधी काळी, पर्वकाळात, विश्रांतीच्या काळात किंवा झाेपतानाही नामस्मरण करीत असावे.प्रपंच हा माणसाची परीक्षा पाहणारा असताे. त्यात कधी संकटे येतात, प्रश्न उभे राहतात आणि त्यातूनही यशस्वी हाेण्यासाठी खटपटी लटपटी कराव्याच लागतात. या सर्वच प्रसंगी सद्बुद्धी, सदाचार आणि नामस्मरण या तिन्हीं गाेष्टींची संगत कधीही साेडू नये. या त्रिसूत्रीनेच यशस्वी हाेता येते.संपत्ती हाती आली किंवा दुर्दैवाने दारिद्र्य आले तरीही नामस्मरणाच्या नेमावर त्याचा परिणाम हाेऊ देऊ नये.
 
नामाला बंधन नसल्याने ते चालताना, बाेलताना, आपला व्यवसाय उद्याेग अगर नाेकरी करताना, जेवणखाण करताना, काेणत्याही परिस्थितीत घेता येते. नाम ही मनाची क्रिया असल्याने त्याचे प्रदर्शन मांडू नये; पण त्याचा नित्यनेम माेडू नये. नामाला शरीरप्रकृतीच्या बळकटीची गरज नसल्याने ते बालपणी, तरुणपणी आणि वृद्धापकाळी, शरीराच्या अगदी दुर्बल अवस्थेतही सहजपणे घेता येते. ‘‘अंते मति:सा गती’’ म्हणजे अंतकाळी जी बुद्धी असेल त्याप्रमाणे गती प्राप्त हाेते असे वचन आहे. म्हणूनच अंतकाळी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत नामस्मरण चालू ठेवले म्हणजेच मृत्यूनंतरही उत्तम गती प्राप्त हाेते. श्री ब्रह्मचैतन्य गाेंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. असे झाले म्हणजेच त्याने अंतकाळ साधला जाऊन सद्गती प्राप्त हाेईल.’’ त्यांचेच परम सद्गुरू श्रीसमर्थांनीच या समासात ‘‘अंतकाळी नामस्मरण असावे’’ हेच सांगितले आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
 
Powered By Sangraha 9.0