यज्ञ करून सकाम भावनेने स्वर्गाची प्राप्ती करून घेणाऱ्या दीक्षितांचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वरांनी त्यांच्या स्वर्गाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात की, अर्जुना, स्वर्गामध्ये अमरत्व हे सिंहासन आहे.ऐरावतासारखे वाहन तेथे मिळते. अणिमादी सिद्धींची भांडारे तेथे आहेत. अमृताची काेठारे आणि कामधेनूचे कळप तिथे आहेत. स्वर्गात देव चाकरी करतात.चिंतामणी नावाच्या मण्यांची जमीन तेथे असते.विहारासाठी कल्पतरूंची उद्याने असतात. करमणुकीसाठी गंधर्व गाणी गातात. रंभेसारख्या अप्सरा नृत्य करतात.उर्वशीसारख्या स्त्रिया कामभाेग देतात. शयनगृहात मदन सेवा करीत असताे. चंद्र आपल्या अमृतकणांनी तेथे सडा घालीत असताे. तेथे वायू हा चाकर म्हणून वावरताे.स्तुतिपाठ करणारे अनेक देव तेथे आहेत.
लाेकपालासारखे देव घाेडेस्वार बनतात व उच्चैश्रवा नावाचा घाेडा सर्वांपुढे असताे. अर्जुना, आणखी किती वर्णन करावे? पण एक गाेष्ट लक्षात ठेव की, पुण्याचा साठा संपल्यावर इंद्रपणाचे वैभव नाहीसे हाेते व परत मृत्यूलाेकात यावे लागते. वेश्येच्या घरी खिशातील पैसा संपला की जसे स्थान रहात नाही, त्याचप्रमाणे यज्ञकर्त्या दीक्षितांचे जिणे लाजिरवाणे हाेते. जन्ममृत्यूंचा ेरा त्यांच्यासाठी चालू हाेताे.स्वप्नामध्ये धन सापडते व जागे झाल्यावर नाहीसे हाेते.त्याप्रमाणे यज्ञ करणाऱ्या दीक्षितांचे असते. धान्यरहित काेंडा पाखडल्यानंतर ज्याप्रमाणे काहीही उरत नाही, त्याप्रमाणे वेदज्ञ जरी झाला तरी मला न जाणल्यामुळे त्याचे जिणे व्यर्थ आहे. माझ्या प्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्तीसाठी केलेले कर्म व्यर्थ हाेते. अर्जुना, यज्ञकर्त्याचे हे दैव तू नीट जाणून घे. यज्ञातील हवनाचा भाेक्ता काेण आहे हे तू नीट ध्यानात घे.