पत्र पस्तिसावे
विश्वंभराचा मुलगा हरि, हरिचा मुलगा विठाेबा, विठाेबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा पुत्र शंकर, शंकराचा मुलगा कान्हाेबा कान्हाेबाचा पुत्र वाेल्हाेबा हाच तुकाेबांचा बाप. वाेल्हाेबाला तीन मुलगे झाले. माेठा मुलगा सावजी. हा विर्नत हाेता. त्याने संसाराची यातायात केली नाही. तुकाेबा मधले. सर्वांत धाकटा मुलगा कान्हाेबा हा संसार धंदा करत असे व तुकाेबांच्या कीर्तनात भाग घेत असे.तुला एक गम्मत सांगताेतुकारामांची जात काेणती याबाबतदेखील विद्वानांच्या मध्ये फार फार वाद आहे.तुकाेबा म्हणतात- बरा कुणबी केलाे। नाही तर दमे असताे मेलाे। याती शुद्र, वैश्य केला वेवसाव। तू श्रीयेचा पती। माझी बहु हीन याती।। जातीचे वाणी मी पाेटीचे ककुडे। नका मजपुढे ठकाठकी।। असल्या उद्गारांमध्ये तुकाेबांनी आपल्या जातीविषयी उल्लेख केला आहे. असे दिसते की तुकाेबाचे घराणे मराठा जातीचे हाेते. ही जात मूळची क्षत्रिय परंतु या जातीला काही लाेक शूद्र समजत असत.
मुंबईस माझे एके ठिकाणी गीतेवर प्रवचन हाेते. खूप वारकरी जमले हाेते. प्रवचन सुरू हाेण्यापूर्वी मी ज्या खाेलीत बसलाे हाेताे त्या ठिकाणी काही लाेक आले व म्हणाले आजच्या प्रवचनात तुकाेबाची जात काेणती याचा निकाल करा.प्रवचन गीतेवर आणि लाेकांची खरी उत्कंठा काय तर तुकाेबांची जात काेणती? माझी खूप ठिकाणी बदली झाली आहे. मला अनुभव असा आला आहे की बड्या ऑफिसरची एखाद्या गावी बदली झाली म्हणजे लाेक आवर्जून बारीक सारीक नाजुक साजूक चाैकशी करतात. ताे काय शिकला आहे किंवा त्याचे काय गुण आहेत, याबद्दल नव्हे तर त्यांची जात काेणती याबद्दल? या लाेकशाहीच्या काळातदेखील निवडणुकीस उभे करताना अथवा मंत्रिपद देताना जातीचा प्रामुख्याने विचार केला जाताे.
हा प्रकार पाहून विनाेदाने म्हणावेसे वाटते कीजात म्हणजे ती जात की जी मनातून जात नाही.मी त्या लाेकांना सांगितले की गीतेच्या प्रवचनात कशाला जातिवाद काढता? पण ते लाेक म्हणाले- ‘तुम्ही न्यायाधीश आहा. आजच्या प्रवचनात तुकाेबांची जात काेणती याचा निकाल कराच.’ प्रवचनात मी हजाराे लाेकांच्या पुढे सांगू लागलाे- ‘तुकाेबांची जात काेणती याबद्दल विद्वानांनी जे म्हटले आहे व ज्याबद्दल खूप वादावादी केली आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हास सांगितली.’ नंतर मी एकदम भावनाविवश झालाे व म्हटले- ‘तुकाेबांची जात काेणती या वादाला किंमत देऊ नका.तुकाेबांचे शब्द हृदयात काेरून ठेवा- ‘तुका म्हणे नाही जातीसवे काम। ज्याचे मुखी नाम ताेचि धन्य।। अहाे, तुकाेबांची जात काेणती हा प्रश्न मला विचारणेस नकाे हाेता.कशाला हा प्रश्न लाेकांनी मला आवर्जून विचारला? तुकाेबांना मी माता माऊली समजताे. माझी जी जात तीच माझ्या आईची जात..