मांडियेला खेळ काैतुकें बहुरुप । आपुलें स्वरुप जाणतसें ।।1।।

16 Sep 2022 14:27:54
 
 

saint 
 
संसार हा एक न संपणारा खेळ आहे.या खेळाचा निकाल लागलाच तर ताे हार असाच असताे. कारण या खेळातील सवंगडीच हारवत असतात. हे सवंगडी म्हणजे माया, माेह, काम, क्राेध, मत्सर, अहंकार, मी, माझा, माझी, माझे आदि असतात. या सवंगड्यावर मात करणे व संसाराच्या माया जाळाचा हा खेळ जिंकणे खराेखर अवघड आहे. हे सत्य असले तरी या खेळात अनेकांना विजयही प्राप्त झाल्याचे आपण पाहताे. या खेळात विजयी ताेच हाेऊ शकताे जाे स्वत:च्या खऱ्या अस्तित्वाची जाण ठेवताे. या सवंगड्याच्या संगतीत रमणारा माणूस स्वत:च्या खऱ्या अस्तित्वाची जाण ठेवू शकत नाही.
 
या सवंगड्याशी रमणे म्हणजे त्यांच्याप्रमाणे हाेणे हाेय. संसार हा केवळ एक प्रकारचा खेळ नाही, तर ताे प्रसंगानुरुप विविध रुपे धारण करणारा खेळ आहे. प्रत्येक खेळातील सवंगडी आपणाला त्यांच्याप्रमाणे खेळायला लावणारे आहेत.संत महात्म्यांना या खेळाच्या अस्तित्वाची व सवंगड्याची खरी ओळख झाल्याने ते त्यांच्यात असूनही वेगळे हाेण्यात यशस्वी झाले. त्यांनी स्वत:चे खरे अस्तित्व ओळखल्याने ते या खेळात राहूनही खेळापेक्षा वेगळे असतात. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, मांडियेला खेळ काैतुके बहुरुप । आपुले स्वरुप जाणतसे ।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0