स्वत:च्या मनाेरंजनासाठी लाेकांच्यात भांडणे, मारामाऱ्या लावून ती मजा बघण्यात त्यांना आनंद वाटताे, त्यांचा जीवनमार्गच चुकीचा असल्याने त्यांना भक्ती , भाव, देव, तीर्थक्षेत्रे, वेद, शास्त्रे, पुराणे, पराेपकार, दानधर्म यांची आवड अजिबातच नसते. सत्कर्माऐवजी कुकर्मे, गुणाऐवजी दाेष, पराेपकाराऐवजी परपीडा, सत्कृत्याऐवजी दुष्कृत्ये, त्यागाऐवजी भाेग हीच त्यांची आवड असते.या सगळ्या विपरीत विकार आणि वागण्यामुळे अशी तमाेगुणी माणसे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्यात अडकतच जातात आणि उलटपक्षी पुढील हीन जन्माची तयारी करीत राहतात; ‘करावे तसे भरावे’ या म्हणीप्रमाणे त्यांना त्यांच्या कुबुद्धीची वाईट फळेच मिळतात. तमाेगुणी माणसांचे वर्णन केल्यानंतर या समासाच्या उपसंहारात श्रीसमर्थ म्हणतात की सद्बुद्धी आणि विवेकाने तमाेगुणावर मात करून साधक एक पायरी वर म्हणजे रजाेगुणी हाेऊ शकताे. हाच प्रगतीचा मार्ग आहे आणि ताे विवेक, वैराग्य आणि विचार यांनी प्रत्येकाला साध्य हाेणारा आहे. मात्र त्यासाठी मनापासून स्वत:ला सुधारण्याची तळमळ धरणे आवश्यक आहे. असे तुम्ही केले तर त्या संकल्पामागे स्वत: भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला मदत करायला उभा असताेच.
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299