नटनाट्य अवघें संपादिलें साेंग । भेद दाऊं रंग न पालटे ।।1।।

14 Sep 2022 16:34:36
 

Saint 
 
संसारात अडकलेल्या जिवाला संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहणे जमत नाही.हे सत्य असले तरी अनेकांनी संसारात राहून स्वत:चे वेगळेपण जाेपासल्याचे आपण पाहताे. हे वेगळेपण त्यालाच सांभाळता येते की ज्याला स्वपरिचय झाला आहे.स्वपरिचय हाेणे तसे अवघड कार्य आहे. असे असले तरी स्वपरिचयापासून दूर जाण्याला आपणच कारणीभूत आहाेत. हे ज्याच्या लक्षात येते, ताे स्वपरिचय करून घेऊ शकताे. स्वपरिचय झालेल्या व्यक्तीस संसाराच्या मायाजाळाचे खरे स्वरूप समजते. इतरांप्रमाणे ताे संसारात अडकलेला दिसत असला तरी ताे त्यापासून वेगळा राहताे, ताे आपल्या निश्चयापासून ढळत नाही.
 
संसाराचा माया, माेहरूपी वेष हा पूर्णत: खाेटा असून आपण संसाराचे हे नाटक करीत आहाेत, हे त्याच्या लक्षात असते. नृत्य करणारा महादेव, पार्वती किंवा आणखी काेणाचे साेंग घेऊन किंवा वेष धारण करून नाचत असला तरीही त्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाण असते.बाह्य वेषाप्रमाणे ताे अंतरंग बदलू शकत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान जाणणारी व्यक्ती संसारात इतराप्रमाणे अडकल्याचे दिसत असली तरी ती आत्मस्वरुपी स्थिर राहते. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, नटनाट्य अवघे संपादिले साेंग । भेद दाऊ रंग न पालटे ।। जय जय राम कृष्ण हरी ज्ञानदास -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0