दुसऱ्यांबद्दल मनात कपट धरून त्याला फसवून त्याचे तळपट कसे हाेईल व त्यातून आपला स्वार्थ कसा साधला जाईल या विचाराने त्यांची कृती हाेत असते. ताेंडाने गाेड बाेलून अंतर्यामी मात्र दुष्ट हेतू धरून ती वागत असतात. त्यांचे इतरांशी वागणे उर्मटपणाचे असते. मात्र ज्याला फसवायचे असेल त्याच्याशी मात्र ती ताेंडात साखर ठेवून बाेलतात. त्यांच्या मनात द्वेषबुद्धी असते. स्वत: भांडखाेर स्वभाव असल्याने भांडाभांडी पाहण्यात आणि भांडणे लावण्यात त्यांना आनंद वाटताे. श्रीसमर्थांच्या काळात लढाया नेहमी चालत म्हणून त्यांनी अशा माणसांना युद्धाची, त्यातील जीव घेण्याच्या प्रवृत्तीची आवड असते असे म्हटल आहे.
आजच्या काळात प्रत्यक्ष लढाई हाेत नसली तरी राेजचे आयुष्य हीच एक लढाई झाली आहे.त्यावेळी तमाेगुणी माणसे फसवणूक, लबाडी, विश्वासघात, चाेरी, चहाडी, या आधुनिक मार्गांनी इतरांचे जिणे नकाेसे आणि मरणप्राय करून टाकतात. हे सर्व तमाेगुण त्या तमाेगुणी माणसाने जाणावेत आणि विवेकाने त्यांचा त्याग करावा म्हणूनच श्रीसमर्थांनी विस्तारपूर्वक सांगितले आहे आणि श्रीसमर्थांचा हा उपदेश मनापासून आचरण्यास सुरुवात केली तर ती माणसेही सुधारून सन्मार्गी हाेतील असा श्रीसमर्थांचा दृढ विश्वास आहे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299