महावितरणचा 17 वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा

विविध स्पर्धा, कार्यक्रमांतून कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा; विजेत्यांना चषक व प्रशस्तिपत्र प्रदान

    09-Jun-2022
Total Views |
 
MAHAVITARAN
 
 
 
पुणे, 8 जून (आ.प्र.) 
 
महावितरणच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडलात क्रिकेट, रांगोळी स्पर्धा, तसेच स्नेहमेळा व शैक्षणिक प्रावीण्य मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आयोजनामुळे नवी ऊर्जा मिळाली. महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त रास्ता पेठेतील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्नेहमेळा आयोजिण्यात आला होता. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे स्नेहमेळ्याचे उद्घाटन झाले. पुणे परिमंडलात 4 व 5 जूनला विभागस्तरीय पुरुष व मंडलस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धा आयोजिण्यात आली होती. या स्पर्धेत मंचर विभागाच्या पुरुष संघाने व रास्ता पेठ मंडलाच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले. बंडगार्डन विभागाचा पुरुष संघ व गणेशखिंड मंडलाचा महिला संघ उपविजेता ठरला. तसेच, परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत उज्ज्वला सोनार- प्रथम, काजल लिंबोळे- द्वितीय, तर अपर्णा मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. उच्च शिक्षणासाठी आयआयटीत प्रवेश मिळविणारे शिवम अंकुश नाळे, हेमंत सुरेश वानखडे, ऋषिकेश रवींद्र कारंडे, डेलिया तुषार काळे, सृष्टी श्रीकांत गंगावणे, मयांक देविदत्त जोशी, आर्यन माणिक राठोड, तसेच शैक्षणिकसह कला व क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे आदित्य काळे, प्रद्युम्न जगनाडे, सोनल कानडे, यश उंडे आणि एमपीएससीतून प्रशासकीय अधिकारी झालेले नीलेश सस्ते यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, संतोष गहेरवार, भक्ती जोशी यांनी केले. कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी आभार मानले.