काेणाच्या दाेस्तीसाठी एक हात पुढे करता तर त्याचवेळी दुसऱ्या हाताने जंबिया दाखवत असता.एखाद्याला अगदी हात जाेडून वरवर नमस्कार करता, अन् त्याच वेळी त्याच माणसाला मनाेमन शिव्यांची लाखाेली वाहत असता, की आज सकाळी सकाळीच या दुष्टाचं ताेंड बघण्याची पाळी आली! पण वरपांगी हात जाेडून गाेड बाेलून अगदी नम्रपणे म्हणत असता, ‘वा! आजचा दिवस माेठा चांगला दिसताे, आज सकाळीच आपली भेट झाली.’ अन् आतून म्हणत असता, ‘आता मेलाे! आज धंद्यात खाेट तर येणार नाही ना? वा बायकाे बराेबर भांडण तर हाेणार नाही ना? काय नशीब.. सकाळी सकाळी या माणसाचं ताेंड बघायची आज वेळ आली.’ आणि याच्या बराेबर हातही जाेडता आहात, स्तुती पण करता आहात आणि मनात हे पण चालत राहतंय..
एक-एक इंद्रियानं आपापल्या तुकड्यांना पकडून ठेवलंय. अन् सगळ्या इंद्रियांचे तुकडे, खंड मिळून आत अखंड हाेत नाहीयेत. किंवा ते सगळे तुकडे काेणा एकाचे अंश आहेत असेही नाही. आत काेणी मालकच नाही. गुर्जिएफ नेहमी सांगत असे-आपण त्या घरासारखे आहाेत, की ज्याचा मालक बाहेर गेलेला आहे, अन् त्याचं घर माेठं आहे, बरंच माेठं आहे. माेठा महाल आहे. तेथे बरेच नाेकर चाकर आहेत.रस्त्यानं जाणारे येणारे काेणी ताे महाल पाहातात अन् जिन्यावरून येणाऱ्या नाेकराला विचारतात की, ‘हा महाल काेणाचा आहे?’ ताे नाेकर म्हणताे, ‘माझा’. घराचा मालक बाहेर गेला आहे. जेव्हा ताे अनाेळखी इसम दुसऱ्या नाेकराला विचारताे, ‘घरमालक काेण आहे?’ ताे नाेकरही म्हणताे, ‘मी’.