सर्व संतांनी भवराेगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने माेठेच आहेत.पण त्यातल्यात्यात समर्थांनी आपली जागा न साेडता,विषयी लाेकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच राेगाचे निदान केले. आमचा मुख्य राेग, संसार दु:खाचा असून ताे सुखाचा आहे असे वाटते, हा आहे. राेग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर ताे बरा कसा हाेणार? राेग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पाेट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलाे तर कसे चालेल? संसार ज्याला दु:खाचा वाटताे त्यालाच परमार्थमार्गाचा उपयाेग.एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्व घालवताे. दारूचा अंमल नसताे त्यावेळी ताे शुद्धीवर येताे, आणि त्याला आपल्या बायकाे मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते.
पण त्याच्या बुद्धिला त्यातून मार्ग सुचत नाही. मग ताे पुन: इतकी दारू पिताे की त्यात त्याला स्वत:चा विसर पडताे, आणि अशा रितीने त्यामध्येच ताे स्वत:चा नाश करून घेताे. अगदी याच प्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती हाेते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटताे, मनुष्य त्यात रमताे. पुढे काही दिवसांनंतर ताे थकताे, त्याची उमेद कमी हाेते, आणि म्हणून, आता आपल्या हातून परमार्थ कसा हाेणार असे त्याला वाटते. पण नंतर ताे पुन: जाेराने प्रपंच करू लागताे, आणि शेपटी हीन अवस्थेत मरून जाताे.जाे जगाचा घात करता ताे एका दृष्टीने बरा,कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल, पण जाे स्वत:चा घात करून घेताे त्याला काेण सांभाळणार? ताे ार वाईट समजावा.केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असताे.
खाेटे कळूनही त्यात सुख मानून ताे राहताे, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यांतच गुरफटून जाताे. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गाेष्टीच आपण आज करताे.आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्यां गाेष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नाेकरी, ताेच ताे पैसा मिळविणे, सगळे तेच. असे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गाेड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दाेन कारणांपैंकी दुसरे कारणच खरे आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे.जाे मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही ताे कशानेच शहाणा हाेत नाही.