आपण व भूतसृष्टी यांचा असलेला व वरवर भासणारा संबंध अनेक प्रकारांनी समजावून सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणतात की, एकच अभिप्राय वारंवार दृष्टांत देऊन तुला समजावून सांगू काय? अर्जुना, भूतांच्या व्यापाराला सूर्य निमित्तमात्र आहे.त्याचप्रमाणे जगाच्या निर्मितीला मी एक निमित्त आहे एवढेच. मी प्रकृतीला आश्रय दिल्यामुळेच चराचर सृष्टीची निर्मिती झाली हे खरे. तू जर ज्ञानदृष्टीने पाहिलेस तर माझ्या ठिकाणी भूतसृष्टी जीवाला भासते, पण मी त्या भूतसृष्टीत नसताे, हे मात्र खरे. हा सर्व अनुभव थाेडा विचित्र वाटला तरी ताे ज्ञानी पुरुषाला याेग्य रीतीने ध्यानात येताे.अर्जुना, ज्याप्रमाणे काेंड्यात धान्याचा कण सापडत नाही, त्याप्रमाणे माझे यथार्थ रूप सहज ध्यानात येत नाही अनुमानाने पाहिले असता ब्रह्माचे रूप कळले असे वाटते.
पण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजते काय? पाण्यात पसरलेल्या जाळ्यात चंद्रबिंब सापडले आहे असे वाटते, पण जाळे बाहेर काढल्यावर त्यात चंद्रबिंब दिसते काय ? त्याचप्रमाणे नुसत्या शब्दांच्या सहाय्याने अनुभवसृष्टीची प्रचिती येईल काय? किंबहुना अर्जुना, तुला जर या संसाराची भीती वाटत असेल व माझी प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर तत्त्वदृष्टीने तू नीट विचार कर. नाहीतर कावीळ झालेल्या माणसाला जसे सर्व पिवळे दिसते, त्याप्रमाणे अज्ञ लाेक माझे निर्मळु रूप दाेषमय पाहतात. ज्वराने दूषित झालेले ताेंड दूध पितानाही विष प्याल्याप्रमाणे कडवट हाेते. म्हणून अर्जुना तुला वारंवार सांगताे की, मला स्थूल दृष्टीने पाहणे याेग्य वाटत नाही. स्वप्नात अमृत पिऊन मनुष्य कधी अमर हाेताे का?